Tue, Oct 22, 2019 01:51होमपेज › Aurangabad › आता तीन दिवसांआड नळांना पाणी

आता तीन दिवसांआड नळांना पाणी

Published On: Apr 10 2018 1:24AM | Last Updated: Apr 10 2018 1:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. ते सुरळीत करण्यासाठी प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी चक्क आता शहराला दोन दिवसांऐवजी तीन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा नवा फॉर्म्यूला मान्य केला आहे. काहीही करा; परंतु सर्व शहराला समान पाणी द्या, कोठे दोन दिवस आड, तर कोठे आठ दिवसआड पाणीपुरवठा करू नका, असे आदेशही मनपा आयुक्तांनी दिले. मनपा प्रशासनाच्या या निर्णयामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शहरातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. ठिकठिकाणी पाण्यावरून वाद-विवाद सुरू झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रभारी मनपा आयुक्त राम यांनी सायंकाळी पालिकेतील अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी पाणीपुरवठा योजनेची स्थिती, पाण्याची आवक, गरज यांची माहिती दिली. बैठकीनंतर राम यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, शहरात सध्या रोज 130 एमएलडी इतकेच पाणी येत आहे. त्यापेक्षा शहराची गरज किती तरी अधिक आहे.

पालिकेची जुनी पाणीपुरवठा योजना 2006 रोजीच कालबाह्य झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात अधिक पाणी येणे कठीण आहे, मात्र जे पाणी येते, त्याचे योग्य वितरण होणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडून तीन दिवसांत सर्व वॉर्डांची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. कुठे किती दिवसांचा गॅप आहे, तो कशामुळे आहे याचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडून सादर करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या अहवालानंतर पाणीपुरवठ्यातील असमतोलही दूर केला जाईल. तशी कार्यवाही करण्याचे अधिकार्‍यांना आदेशित केले आहे. 


पाण्याचा  प्रश्‍नही पेटला


शहरात कचर्‍यापाठोपाठ पाण्याचा प्रश्‍नही पेटला आहे. सिडको एन-5 च्या जलकुंभावरून सहा-सहा दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त झालेल्या सुमारे पंधरा नगरसेवकांनी सोमवारी कार्यकर्त्यांसह जलकुंभावर जाऊन आंदोलन केले. यावेळी या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल आणि उप अभियंता इलियास ख्वाजा यांना घेराव घालत धारेवर धरले. शेवटी महापौर आणि मनपा आयुक्तांनाही तिथे धाव घ्यावी लागली. मनपा आयुक्तांनी प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन संपले. 

सिडकोतील एन-5 च्या जलकुंभावरून सिडको-हडकोसह मुकुंदवाडी, चिकलठाणापर्यंतच्या 17 वॉर्डांना पाणीपुरवठा     होतो. मात्र मागील काही महिन्यांपासून या वॉर्डांना दोन दिवसांआडऐवजी तब्बल सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संबंधित वॉर्डाच्या नगरसेवकांनी व नागरिकांनी सोमवारी एकत्रित येत सकाळी 10 वाजता जलकुंभावर धाव घेतली. यामध्ये माजी महापौर भगवान घडामोडे, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, नगरसेविका माधुरी अदवंत, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक सोहेल शेख, सेनेचे मनोज गांगवे, कमलाकर जगताप, तसेच नगरसेविका पती बालाजी मुंढे, सुनील नाडे, दामू अण्णा शिंदे, रामचंद्र नरोटे आदींचा समावेश होता. नगरसेवकांनी जलकुंभाच्या आवारातील गेट बंद करत टँकरचा भरणाही बंद केला.

त्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल आणि उपअभियंता ख्वाजा हे तिथे दाखल झाले. दोन दिवसांआड पाण्याचे नियोजन असताना सहा-सहा दिवस पाणी का मिळत नाही, अशी विचारणा करीत संतप्त नगरसेवकांनी त्यांना घेराव घातला. त्यावर हे अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे नगरसेवक आणखीनच संतप्त झाले. थोड्या वेळाने उपमहापौर विजय औताडे तिथे पोहचले. त्यापाठोपाठ महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेता विकास जैन हेही तिथे आले. यावेळी महापौरांनीही अधिकार्‍यांना जाब विचारत फैलावर घेतले. महापौरांपाठोपाठ प्रभारी मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे देखील जलकुंभावर आले. त्यांनी नगरसेवकांची भेट घेत या विषयावर मनपा मुख्यालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर दुपारी 1 वाजता हे आंदोलन संपले. 

Tags : Aurangabad, water, comes, after, day, three days