Tue, May 21, 2019 04:33होमपेज › Aurangabad › कचराफेकीसाठी आता मनपाचा गनिमी कावा

कचराफेकीसाठी आता मनपाचा गनिमी कावा

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 16 2018 11:34PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कन्नडचे आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेने रविवारी पिशोर येथे 25 ट्रक कचरा पाठविला, परंतु दुपारनंतर किरकोळ विरोधानंतर मनपाने माघार घेतली. पालिकेने आता पुन्हा नवीन जागा शोधली आहे. या अज्ञात जागेवर सोमवारी रात्री 70 ट्रक कचरा पाठविण्याची तयारी पालिकेने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मनपाने कचरा टाकण्यासाठी शहरालगतच्या चार जागा निश्‍चित केल्या होत्या. त्यापैकी चिकलठाणा आणि हर्सूल येथे कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध     केला. त्यामुळे सध्या या दोन ठिकाणी कचरा टाकणे बंद आहे. परिणामी पालिकेची अडचण वाढली आहे. या परिस्थितीत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शहरातील कचरा कन्नड तालुक्यातील गायरान जमिनीवर टाकण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार रविवारी मनपाने पिशोर येथे हिराजी महाराज साखर कारखाना परिसरात 31 ट्रक रिकामे केले. मात्र त्यानंतर ग्रामस्थांनी विरोध केल्याचे सांगत मनपाने माघार घेतली. आता नव्याने जागेचा शोध घेण्यात आला आहे. या जागेवर रात्रीतून सुमारे 70 ट्रक कचरा टाकला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पालिकेकडून या जागेबाबत अतिशय गोपनीयता पाळण्यात आली आहे. 

पोलिस संरक्षणासाठी पत्र 

हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव येथे कचरा टाकण्यास काही दिवसांपासून विरोध होत आहे. पालिकेच्या अधिकार्‍यांनी स्थानिक नागरिकांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिक त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी ओला कचरा टाकण्यासाठी पोलिस बंदोबस्त घेण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पोलिस आयुक्‍तालयाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. 

कचरा उचलणे बंद, नगरसेवक त्रस्त

कचरा टाकण्याच्या दोन जागा बंद झाल्याने मनपाची अडचण वाढली आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून प्रभाग 6 मधील कचरा उचलणे बंद झाले आहे. त्यामुळे न्यायनगरसह या प्रभागात येणार्‍या वॉर्डांमध्ये कचराच कचरा पडला आहे. म्हणून न्यायनगर वॉर्डाचे नगरसेवक गजानन मनगटे यांनी सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन वॉर्डातील कचरा उचलण्याची मागणी केली. मनगटे यांनी दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांच्याकडेही हा कचरा उचलण्याची मागणी केली होती. त्यावर निपुण यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु दोन दिवस उलटून गेल्यावरही परिस्थितीत बदल झाला नसल्याचे नगरसेवक मनगटे यांनी सांगितले.