Thu, Jul 18, 2019 08:10होमपेज › Aurangabad › संघासाठी आता अनुकूल परिस्थिती : चितळे

संघासाठी आता अनुकूल परिस्थिती : चितळे

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 30 2018 12:53AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाढविण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची तपश्‍चर्या, त्याग कारणीभूत ठरले आहे. मी लहानपणापासून वडिलांसोबत संघ शाखेत जात होतो. तेव्हापासून मी ही तपश्‍चर्या अनुभवली. मात्र, आता ते खडतर दिवस गेले असून संघाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फायदा घेत संघाने इतर देशांसोबत संबंध मधुर करण्यासाठी माणसे घडविली पाहिजे असे प्रतिपादन जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी बुधवारी (दि.29) व्यक्‍त केले.

यशोमंगल सभागृहात ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी माधवराव चितळे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. अ‍ॅग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटर व वेदांत गृहकुल निवासी संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होेते. किसान संघाचे दिनेश मंत्री, राज्य माहिती आयुक्‍त दिलीप धारूरकर यांची यावेळी उपस्थिती होती. अरुण करमरकर यांनी विविध प्रश्‍न विचारून चितळे यांना बोलते केले. बालपणापासूनचा प्रवास  चितळे यांनी दिलखुलासपणे उलगडला. ते म्हणाले, वडील चाळीसगाव येथे संघचालक होते. मी लहानपणापासूनच संघ शाखेत जायचो. यामुळे संघ व्यवस्था काय आहे याचा अभ्यास झाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी माझे ऋणानुबंध होते. त्यांच्या आवडत्या सचिवांपैकी मी होतो. अतिगोपनीयतेच्या पलीकडील असलेले ‘नो-पेपर’ घेऊन जाण्याची जबाबदारी एकदा पंतप्रधानांनी माझ्यावर टाकली होती. नेपाळला एकदा पंतप्रधान जाणार होते. नेपाळच्या पंतप्रधानांनी तेव्हा चितळे यांची एक तासाची  मुलाखत दूरदर्शनवर प्रसारित करण्याची विनंती केली होती. असे अनेक किस्से चितळे यांनी मुलाखतीत सांगितले. भारताकडे आशियातील देश आशेने बघतात. त्यांच्यामध्ये विश्‍वासार्हता निर्माण करून आशियाचे नेतृत्व करण्याची भारताला संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात हरिभाऊ बागडे यांनी माधवराव जरी इंदूरला जात असले तरी कार्यक्रमासाठी शहरात येतील असा आशावाद व्यक्‍त केला. तसेच माधवराव चितळे यांचे पाणी व शेतीसाठी भरीव योगदान असून ते जलचिंतक असल्याचे त्यांनी सांगितले. दिनेश कुलकर्णी, दिलीप धारूरकर यांनीही मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन प्रा. शरद भोगले यांनी केले.