Fri, Feb 28, 2020 17:58होमपेज › Aurangabad › पाकवर हल्ला कराच : प्रवीण तोगडिया

पाकवर हल्ला कराच : प्रवीण तोगडिया

Published On: Feb 10 2018 4:59PM | Last Updated: Feb 10 2018 5:22PMऔरंगाबाद:  प्रतिनिधी

देशातील ९० टक्के सैनिक हे शेतकर्‍यांची मुले आहेत. इकडे शेतकरी आत्महत्या करतोय, तर सीमेवर पाकिस्तान जवानांचे बळी घेत आहे. भारताकडे असणारे रणगाडे, क्षेपणास्त्रे प्रदर्शनासाठी नसून, त्यांचा वापर करून पाकिस्तानवर हल्ला करण्याची गरज आहे, असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी शनिवारी औरंगाबादेत व्यक्त केले.

शहरातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर तोगडिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशातील आरोग्य सेवेतील त्रुटीबद्दल ते म्हणाले की, देशातील तीन व्यक्तीमागे एकजण आजारी आहे.  एकूण लोकसंख्येत आजारी व्यक्तींची संख्या तब्बल ४५ कोटी असून, त्याचे प्रमाण ३३ कोटी आहे. घरातील व्यक्तीला अचानक आजार जडल्याने उपचारावर २ ते ५ लाखांचा खर्च करून  एक कोटी कुटुंबिय कर्जबाजारी झाली आहेत. त्यामुळे देशाचे आरोग्यच ‘आयसीयू’त असल्याचे वाटते, असे ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, देशातील ५ हजार ५०१ आरोग्य केंद्रात डॉक्टरांची २२ हजार ४९६ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात ४ हजार १५६ डॉक्टर कार्यरत आहेत. रुग्णालयांसाठी इमारती, यंत्रे आहेत, मात्र डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांचा अभाव आहे. बांगलादेश, नेपाळ सारख्या लहान देशांपेक्षाही भारताचा आरोग्यावरील खर्च कमी असल्याचे डॉ. तोगडिया यांनी सांगितले. 

देशातील ५० कोटी लोकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केली आहे. त्यासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पैसा कोठून आणणार, याचा खुलासा जेटली यांनी करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.