Wed, Apr 24, 2019 01:32होमपेज › Aurangabad › लाखावरील थकबाकीदारांना जप्‍तीच्या नोटीस

लाखावरील थकबाकीदारांना जप्‍तीच्या नोटीस

Published On: Jan 18 2018 1:59AM | Last Updated: Jan 18 2018 1:55AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेेतली आहे. एक लाखापेक्षा जास्त कर थकलेल्या मालमत्ताधारकांना थेट जप्‍तीच्या नोटीस जारी करण्याचे आदेश मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर यांनी बुधवारी दिले.

मनपा आयुक्‍त मुगळीकर यांनी बुधवारी कर वसुलीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनीच याविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, चालू आर्थिक वर्षासाठी थकबाकी आणि चालू मागणी असे मिळून 342 कोटी रुपयांचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे, परंतु आतापर्यंत केवळ 54 कोटी रुपयांचीच कर वसुली होऊ शकली आहे. कर वसुलीसाठी आऊटसोसिर्ंंगच्या माध्यमातून नुकतेच वाढीव मनुष्यबळ दिले आहे. त्यामुळे आता कोणत्याही सबबही ऐकल्या जाणार नाहीत. मार्चअखेरपर्यंत किमान 250 कोटी रुपयांची कर वसुली होईल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी वसुली मोहीम गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांच्याकडे एक लाखाच्या वर कर थकला आहे, अशा मालमत्ताधारकांना जप्‍तीच्या नोटीस बजावण्यात येणार आहेत. तसे स्पष्ट आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत.