Mon, Apr 22, 2019 22:21होमपेज › Aurangabad › शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले

शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी म्हणून महानगरपालिका प्रशासनाने दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांआड केला, परंतु त्यानंतरही पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारलेली नाही. जुन्या शहरासह सिडको-हडकोतील अनेक वसाहतींमध्ये चार-चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. उलट ज्या भागात आधी पाणीपुरवठा सुरळीत होता, त्या भागातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरात यंदा पाणीटंचाईचा प्रश्‍न तीव्र बनला आहे. पालिकेचे दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन असूनही असंख्य वॉर्डांना चार-चार दिवस पाणी मिळत नव्हते. विशेष सिडको-हडकोसह जुन्या शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती गंभीर बनली होती. त्यामुळे या विरोधात सिडकोतील नगरसेवकांनी तसेच नागरिकांनी मागील महिनाभरात अनेक आंदोलने केली. दुसरीकडे काही वॉर्डांत दोन दिवसांआड नियमित पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे समान पाणी वाटप करण्याची मागणी एमआयएमने केली होती. सिडकोतील पाणीप्रश्‍नावर पंधरा दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्‍त कार्यालयात मुक्काम आंदोलन केले. त्यानंतर तत्कालीन प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शहरात सर्वत्र समान पाणी देण्यासाठी म्हणून दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांआड केला.

पालिका प्रशासनाने 11 मे पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, परंतु या बदलानंतरही शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा   झालेली नाही. सद्यःस्थितीत जुन्या शहरातील विशेषतः शहागंज जलकुंभावरील 16 वॉर्ड तसेच सिडकोतील काही वॉर्डांना चार ते पाच दिवसांआडच पाणीपुरवठा होतो आहे. दुसरीकडे आधी ज्या भागात नियमितपणे दोन दिवसांआड पाणी मिळत होते, आता तेथेही पालिकेच्या तीन दिवसांआडच्या निर्णयामुळे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या भागातही पालिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.