Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Aurangabad › राष्ट्रवादीच्या सभेला  परवानगी नाकारली

राष्ट्रवादीच्या सभेला  परवानगी नाकारली

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 03 2018 1:41AMऔरंगाबाद :  प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 3) काढण्यात येणार्‍या हल्लाबोल मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली. त्यावेळी विभागीय आयुक्‍तालयासमोर शरद पवार यांच्या सभेला मात्र परवानगी नाकारण्यात आली. विशेष म्हणजे, बेगमपुरा ठाण्याच्या काही कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या स्टेजचे कामही थांबविले होते. हे सरकारचे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने मात्र कोणत्याही परिस्थितीत तेथेच सभा घेण्याचा निर्धार पक्‍का केला आहे. 

मराठवाड्यातील विविध प्रश्‍नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढून सरकारवर हल्लाबोल आंदोलन गेल्या महिन्यात सुरू केले होते. उस्मानाबादेतून या आंदोलनाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी नेत्यांनी संपूर्ण मराठवाड्याची परिक्रमा केल्यानंतर आता या आंदोलनाचा समारोप शनिवारी औरंगाबादेत होणार आहे. समारोपानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने क्रांती चौक-पैठणगेट-गुलमंडी-सिटी चौक-शहागंज-चेलीपुरामार्गे विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्यानंतर शरद पवार यांची विभागीय आयुक्‍तालयासमोरच सभा आयोजित केली आहे. मोर्चाच्या समारोपाला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एक लाख लोकांची गर्दी करण्याचे नियोजन पक्षाने केले असून मोर्चाचा समारोप सभेने करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर दिल्लीगेटजवळ स्टेज उभारण्याचे कामही शुक्रवारी सुरू होते, परंतु रस्त्यावर स्टेज उभारू नका, अशी अट पोलिसांनी घालून रस्त्यावर सभेला परवानगी नाकारली आहे. शिवाय शुक्रवारी सायंकाळी बेगमपुरा ठाण्याच्या काही कर्मचार्‍यांनी या स्टेजचे काम थांबविले, परंतु धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पुन्हा काम सुरू झाले होते.

काय आहे पोलिसांची अट

हल्लाबोल मोर्चाचा समारोप सुभेदारी गेस्ट हाऊसच्या पूर्वेकडील गेटलगत पार्किंगच्या जागेत करावा. त्याचे संबंधित विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे. तसेच, मोर्चाचे स्टेज विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोरील रोडवर अथवा कै. अण्णा भाऊ साठे चौक ते दिल्लीगेट रस्त्यावर उभारू नये.