Tue, Jul 16, 2019 13:39होमपेज › Aurangabad › छावणी डेपोत मनपाला आजपासून ‘नो एन्ट्री’

छावणी डेपोत मनपाला आजपासून ‘नो एन्ट्री’

Published On: Mar 05 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 1:41AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

छावणी कचरा डेपोत महानगर पालिकेला कचरा टाकण्याची परिषदेने दिलेली मुदत ही सोमवारी सायंकाळी संपणार आहे. पर्यायी व्यवस्था झाल्यावर मनपा कचरा उचलून नेणार आहे. पाच दिवसांत मनपाने या डेपोत सुमारे शंभर ट्रक कचरा टाकला आहे.

शहराजवळील कोणत्याही भागात महानगर पालिका प्रशासनास नागरिक कडाडून विरोध करत आहेत. अनेक गावांतील नागरिकांनी तर जीव गेला तरी कचरा टाकू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मनपा प्रशासन हतबल झाली आहे. कचरा टाकण्यास विरोध होत असल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. यावर उपाय म्हणून कचरा कुंडीजवळील कचरा जाळण्यात येत आहे. त्याचादेखील त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून न्यायालयात निर्णय होईपर्यंत महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन यांनी 1 मार्च रोजी छावणी परिषदेकडे गोलवाडी डेपोत कचरा टाकण्याची परवानगी मागितली होती. छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांनी याबाबत अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी होकार दिल्यानंतर परिषदेनी 5 मार्चपर्यंत दररोज 20 ट्रक कचरा छावणीतील गोलवाडी कचरा डेपोत टाकण्याची परवानगी दिली होती. हे वृत्त कळताच दुसर्‍या दिवशी छावणीसह गोलवाडी व तीसगावच्या नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करून परिषदेची कचरा वाहून नेणारी रिक्षा फोडली होती. तसेच नागरिकांनी उपाध्यक्ष गारोल यांच्याकडे कचरा टाकू न देण्याची मागणी केली होती. त्यावर संतापलेल्या लोकांना गारोल यांनी मनपासोबत पाच दिवसांचेे करारपत्र दाखविल्यावर ते शांत झाले.

शंभर ट्रक कचरा फेक
गोलवाडीच्या कचरा डेपोत कचरा टाकण्यासाठी छावणी परिषदेनी 5 मार्चपर्यंत परवानगी दिली आहे. त्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. आता त्यांना डेपोत कचरा टाकू दिला जाणार नाही. तसेच त्यांनी आतापर्यंत जो शंभर ट्रक कचरा डेपोत टाकला आहे, तोदेखील मनपा प्रशासन त्यांची पर्याय व्यवस्था झाल्यावर उचलून नेणार असल्याचे परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी सांगितले.