Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Aurangabad › ‘निपाह’चा औरंगाबादेतही धोका

‘निपाह’चा औरंगाबादेतही धोका

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 24 2018 12:31AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

निपाह व्हायरसने धुमाकूळ घातला असून, ऐतिहासिक व पर्यटन राजधानी असलेला औरंगाबाद जिल्हाही निपाहच्या कचाट्यात येण्याचा धोका वाढला आहे. शहरातील अनेक जण पर्यटनासाठी केरळसह दक्षिण भारतात सहलीवर गेल्याची माहिती टुरिस्ट कंपन्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेऊन येणारी ही मंडळी आपल्यासोबत निपाह व्हायरस घेऊन येण्याची शक्यता आहे. 

उन्हाळ्यामध्ये औरंगाबादसह महाराष्ट्रातून हजारो पर्यटक दक्षिण भारतात पर्यटनासाठी जातात. सध्या केरळात जीवघेण्या निपाह व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. या व्हायरसची लागण झालेल्या अनेकांचा बळी गेला असून, शेकडो जणांवर उपचार सुरू आहेत. निपाहची लागण झाल्यास 48 तासांच्या आत संबंधितास उपचार न मिळाल्यास, रुग्ण कोमात जातो. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आतापर्यंत एकही लस तयार झालेली नाही, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे. हा व्हायरस अत्यंत वेगाने पसरणारा असल्याने जीव जाण्याचा धोका अधिकच वाढला आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना, जिल्हा प्रशासन मात्र या धोक्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. 

दक्षिण भारतातून हजारो भाविक शिर्डीला येतात. शिर्डीपासून औरंगाबाद जवळ असल्याने, वेरूळ येथील घृष्णेश्‍वर मंदिर, अजिंठा यासह शहरातील पाणचक्‍की, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक येतात. तसेच शहर व जिल्ह्यातूनही पर्यटक दक्षिण भारतात पर्यटनासाठी जातात. 

शहरातील काही टुरिस्ट कंपन्यांकडे विचारणा केली असता, शहरातील 15-20 जणांचा गु्रप केरळला गेलेला आहे, तसेच दक्षिण भारतातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठीही अनेकजण गेलेले आहेत, मात्र आत्ताच त्यांची संख्या सांगता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पक्ष्यांनी कुरतडलेली फळे खाऊ नका; प्रशासन सतर्क

निपाह या व्हायरसमुळे सध्या केरळच नव्हे तर देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात सध्यातरी या विषाणूचा धोका नसला तरी आरोग्य विभागाने प्र्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले असून काही गाईडलाईन पाठविल्या आहेत. पक्ष्यांनी कुरतडलेली फळे न खाण्याच्या तसेच या विषाणूची लागण झालेल्या व्यक्‍तीच्या संपर्कात न येण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. घाटी प्रशासनानेही सर्व विभागप्रमुखांना याबाबत सतर्क केले आहे.

निपाह हा अत्यंत घातक विषाणू असून तो 48 तासांत जीवघेणा ठरतो. निपाहचा धोका  टाळण्यासाठी सध्या कोणतेही औषधी उपलब्ध नाहीत. केरळमध्ये या विषाणूमुळे 11 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात सध्यातरी या विषाणूचा धोका नसल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत असला तरी केरळमधून जर एखादा इन्फेक्टेड रुग्ण राज्यात आला तर येथेही ही साथ पसरू शकते. यामुळे आरोग्य विभागाने काही गाईडलाईन दिल्या आहेत.