Thu, Apr 25, 2019 14:19



होमपेज › Aurangabad › पुढच्या वर्षी पोलिसांना मिळणार घरे

पुढच्या वर्षी पोलिसांना मिळणार घरे

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 27 2018 12:04AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी बांधण्यात येत असलेल्या 532 निवासस्थानांचे काम हे वर्षभरातच 50 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण होणार असल्याने ठरलेल्या वेळेत पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना टकाटक घरे मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पोलिस आयुक्‍तालयाची सज्ज प्रशासकीय इमारत 10 मे रोजी पोलिस प्रशासनास ताब्यात मिळणार असल्याचे पोलिस उपायुक्‍त डॉ. दिपाली घाडगे यांनी सांगितले.

राज्य शासनाने पोलिस आयुक्‍तालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीबरोबरच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी नवीन घरे बांधण्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये 2016 मध्ये मंजूर केले होते. त्यानुसार पैसे मंजूर झाल्याबरोबर आयुक्‍तालयाची इमारत पाडण्यास सुरुवात केल्याने तिचे काम ऑगस्ट 2016 मध्ये सुरू झाले होते. त्याशिवाय अत्यंत जुन्या झालेल्या चाळी पद्धतीच्या घरात राहणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना घरे खाली करण्याबाबत आयुक्‍तालयात नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ज्या कर्मचारी व अधिकार्‍यांना जवळपास किरायाने घरे मिळाली, ते ताबडतोब सोडून गेले होते. मात्र अनेकांना पोलिस असल्याने किरायाने घरे मिळण्यास अडचणी येत होत्या.

त्याशिवाय कर्मचारी व अधिकार्‍यांची मुले ही जवळपासच्या शाळा व महाविद्यालयांत शिक्षण घेत असल्याने ती देखील अडचण होती. त्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्‍त अमितेशकुमार यांनी ही अडचण लक्षात घेऊन कर्मचारी व अधिकार्‍यांना काही दिवसांची मुदत वाढवून दिली होती. तसेच मिटमिटा भागातील म्हाडाची घरे पोलिस अधिकार्‍यांसाठी खरेदी केली. तर अनेक पोलिसांना क्रांती चौक व टीव्ही सेंटर येथील पोलिस कॉलनीतील बंद घरांची डागडुजी करून तेथेे कर्मचार्‍यांच्या राहण्याची सोय केली. या सर्व अडचणींमुळे या निवासस्थानांच्या बांधकामाला उशिराने 9 फेब्रुवारी 2017 ला सुरुवात झाली. सध्या या ठिकाणी आता कर्मचार्‍यांसाठी 7 मजल्याच्या 9 इमारती ज्यामध्ये एका इमारतीत 56 फ्लॅट राहणार असून एकूण फ्लॅटची संख्या 504 राहणार आहे.पोलिस उपनिरीक्षकांसाठी 1 सात मजली इमारत असून ज्यामध्ये 28 फ्लॅट राहतील. सहाय्यक पोलिस आयुक्‍तांसाठी 1 इमारत ज्यामध्ये चार फ्लॅट राहणार आहेत. त्याशिवाय उपआयुक्‍तांसाठी 3 व आयुक्‍तांसाठी 1 प्रशस्त असा बंगला राहणार आहे. तसेच या परिसरात जिम, रीडिंग रूम व कॉम्प्यूटर रूमदेखील बांधण्यात येत आहे.

10 मे ला मिळणार आयुक्‍तालयाचा ताबा : एकवीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पोलिस आयुक्‍तालयाची सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत तयार झाली आहे. फक्‍त अंतिम टप्प्यातील कामे बाकी राहिले आहे. पोलिस गृहनिर्माण विभागाच्या अधिकार्‍यांनी नुकतीच या इमारतीची पाहणी केली आहे. त्यामुळे ही इमारत 10 मे रोजी ताब्यात मिळणार असल्याचे पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली घाडगे यांनी सांगितले.

पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी बांधण्यात येत असलेल्या निवासस्थानांपैकी कर्मचार्‍यांसाठी असलेल्या इमारतीच्या 72 पैकी 12 स्लॅबचे काम राहिले आहे. पोलिस उपनिरीक्षकांच्या इमारतीचे आठपैकी पाच स्लॅब पूर्ण झाले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बंगल्यांचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. जिम, रीडिंगरूम व कॉम्प्यूटर रूमचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरसीसीचे काम पूर्ण होणार होईल.याबरोबरच प्लास्टर, ग्रेनाईड, वायरिंगचे काम बरोबरीने सुरू असल्याने वर्षभरातच 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2019 मध्ये ही घरे पोलिसांना ताब्यात मिळण्याची दाट शक्यता असल्याचे प्रकल्प अभियंता जयंत पाटील यांनी सांगितले.

Tags : Aurangabad, Next, year, police, houses