Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Aurangabad › चला, दंगल विसरून पुढे जाऊया

चला, दंगल विसरून पुढे जाऊया

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 1:04AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पाच महिन्यांत चार दंगलींमुळे पोलिस रेकॉर्डवर औरंगाबाद शहर अतिसंवेदनशील म्हणून पुन्हा अधोरेखित झाले. त्यामुळे येथे धाक-दडपशाही करण्यापेक्षा जनतेशी सांगड घालून कारभार करण्याला प्राधान्य देत ‘चला, दंगल विसरून पुढे जाऊया, चांगले शहर घडवूया’ अशी साद नवनियुक्‍त पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी घातली. प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांच्याकडून मंगळवारी (दि. 29) दुपारी 2 वाजता पदभार स्वीकारल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

अडीच महिन्यांपासून रिक्‍त असलेल्या पोलिस आयुक्‍तपदी नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची सोमवारी नियुक्‍ती झाली. मंगळवारी दुपारी शहरात दाखल होत ते सरळ पोलिस आयुक्‍तालयात आले. पोलिस आयुक्‍तांच्या निवासस्थानातच त्यांचे कार्यालय आहे. तेथे येताच सर्वप्रथम त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्‍त राहुल श्रीरामे, विनायक ढाकणे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्यासह सहायक आयुक्‍त डॉ. नागनाथ कोडे, चंपालाल शेवगण, एच. एस. भापकर आणि मोजक्या पोलिस निरीक्षकांची उपस्थिती होती. प्रोटोकॉलनुसार अधिकार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर चिरंजीव प्रसाद यांनी मिलिंद भारंबे यांच्याकडून पदभार स्वीकारला. खुर्चीवर बसताच त्यांना माध्यम प्रतिनिधींनी घेरले.