Wed, Feb 20, 2019 02:33होमपेज › Aurangabad › ‘शुभ कल्याण’ने केले वाटोळे 

‘शुभ कल्याण’ने केले वाटोळे 

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Feb 01 2018 1:27AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डिमांड ड्राफ्टची (डीडी) रक्‍कम परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अनेक व्यापार्‍यांची फसवणूक करणार्‍या शुभ कल्याण मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटीचा आणखी एक कारनामा समोर आला. शहरातील तब्बल वीस व्यापार्‍यांना दोन कोटी 19 लाख 52 हजार 200 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात मंगळवारी (दि. 30) गुन्हा नोंद झाला. ‘शुभ कल्याण’विरुद्ध हा तिसरा गुन्हा ठरला असून यापूर्वी सिटी चौक आणि क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. 

शुभ कल्याण सोसायटीचा अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक दिलीप शंकरराव आपेट, भास्कर बजरंग शिंदे, अजय दिलीपराव आपेट, नागिणीबाई बजरंग शिंदे, विजय दिलीपराव आपेट, कमलाबाई बाबासाहेब नखाते, शालिनी दिलीपराव आपेट, अभिजित दिलीपराव आपेट, प्रतिभा अप्पासाहेब आंधळे, आशा रामराव बिराजदार, बापूराव ज्ञानोबा सोनकांबळे, शिवकुमार गंगाधर शेटे आणि राम महादेव रोडे, अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी शिवकुमार शेटे याला क्रांती चौक पोलिसांनी अटक केलेली असून तो हर्सूल कारागृहात आहे. तसेच, शुभ कल्याणची 12 खाती गोठविण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रितेश सतीश कृपलाणी (33, रा. सिंधी कॉलनी) हे कपडा व्यापारी आहेत. ते शुभ कल्याण मल्टिस्टेट सोसायटीतून डीडी काढून व्यवहार करतात. 8 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी 14 लाख 92 हजार 500 रुपयांचे डीडी काढले. ते डीडी व्यवहारासाठी संबंधित व्यापार्‍यांना दिले. परंतु, ते वटले नाहीत. संबंधित व्यापार्‍यांनी कृपलाणी यांना तसे कळविल्यानंतर रितेश यांनी शुभ कल्याण सोसायटीशी संपर्क साधला. त्यानंतर हे पैसे सोसायटीचे अध्यक्ष दिलीप आपेट यांच्या आदेशाने इतरत्र वळते केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले असून लवकरच परत करू असे आश्‍वासनही सोसायटीच्या संचालकांनी दिले. त्यानंतर बचत खाते उघडायला लावून पैसे देतो, अशी थाप मारली. परंतु, एक रुपयाही मिळाला नाही. अखेरीस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.