होमपेज › Aurangabad › रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी

रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Feb 01 2018 1:23AMसिल्लोड : प्रतिनिधी

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून एक दिवसाच्या नवजात बाळाला अज्ञात महिलेने चोरून नेल्याची धक्‍कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या बाळाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत चोराचा आणि बाळाचा काही थांगपत्ता लागला नव्हता. विशेष म्हणजे ‘बाळाच्या आईने तिला एकटी सोडून जागेवरून उठून जायलाच नको होते’ असे म्हणत रुग्णालयाने या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला.

घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी येथील आसमाबी शेख आसेफ (26)  या महिलेस मंगळवारी (दि. 30) रात्री दहा वाजेच्या सुमारात पतीने प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान या महिलेने एका गोंडस मुलीस जन्म दिला. बाळाची आणि आईची प्रकृती एकदम ठणठणीत होती. 

 बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आसमाबी व तिची आई दवाखान्यात बसले होते. त्यावेळी एक अनोळखी बुरखाधारी महिला त्यांच्या जवळ आली  व ‘माझा पाच महिन्यांचा गर्भपात झाला’ असे सांगत तिने रडण्यास सुरुवात केली. तिची कहाणी ऐकून आसमाबी व तिच्या आईला वाईट वाटले. दोघींनी तिची समजूत     घालत तिला शांत केले. त्यानंतर ती बुरखाधारी महिला तब्बल एक तासभर या दोघींशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसली. तिने दोघींना गप्पांमध्ये गुंगविले आणि जवळीक वाढवली. काही वेळाने आसमाबी हिने लघुशंका आल्याचे तिच्या आईला सांगितले. तेव्हा आईने ‘त्या’ बुरखाधारी महिलेला ‘आमच्या बाळाकडे लक्ष द्या, मी हिला बाथरूममध्ये घेऊन जाते’ असे सांगितले. त्या माय-लेकी बाथरूमकडे गेल्या. काही वेळातच त्या परत आल्या तेव्हा त्यांना धक्‍काच बसला. कारण खाटावरील आसमाबीचे नवजात बाळ आणि ती बुरखाधारी महिला दोघेही गायब होते. या माय-लेकींनी हॉस्पिटलच्या आवारात शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. तेव्हा आपल्याला विश्‍वासात घेऊन ती बुरखाधारी महिला आपल्या नवजात मुलीला चोरून घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि मग दोघींनी एकच हंबरडा फोडला. 

त्यांचा आक्रोश ऐकून मोठी गर्दी जमा झाली. मग हॉस्पिटलच्या कर्मचारी व इतरांनी परिसरात बाळाचा आणि त्या महिलेचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. शेवटी वैद्यकीय अधीक्षक सपकाळ यांनी बाळाच्या चोरीची पोलिसांना माहिती कळविली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बजरंग कुठुम्बरे हे रुग्णालयात दाखल झाले. नंतर पोलिसांनीही त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत बाळाचा आणि चोर महिलेला काहीही थांगपत्ता लागला नव्हता. या प्रकरणी ‘त्या’ अज्ञात बाळचोर महिलेविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

माझे बाळ मला मिळवून द्या...

या प्रकारानंतर आसमाबीने ‘माझे बाळ मला मिळवून द्या होऽऽऽ’ असा हंबरडा फोडत त्या चोर महिलेचा पोलिसांनी तातडीने शोध घेण्याची विनंती केली. आसमाबीचे माहेर सिल्लोड असून सासर नळणी आहे. तिला तीन मुली आहेत. ही चौथी मुलगी तिला झाली होती. 

 रुग्णालयाचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातून तसेच सोयगाव, भोकरदन, जाफराबाद येथून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. रोज कमीत कमी चाळीस महिलांची येथे प्रसूती होते, तर पाचशे च्या वर रुग्ण तपासणीसाठी येत असतात. या रुग्णालयाच्या सुरक्षेचा भार अवघ्या दोन सुरक्षारक्षकांवरच आहे. दिवसा एक व रात्री एक अशी आळीपाळीने हे दोन्ही सुरक्षारक्षक सेवा बजावतात. रुग्णालयाचा परिसर आणि तेथे येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी असल्याने हा भार या दोन सुरक्षारक्षकांकडून पेलवणे अशक्यच होते. त्यामुळे या रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सीसीटीव्ही शोभेची वस्तू

धक्‍कादायक बाब म्हणजे या उपजिल्हा रुग्णालयात दीड वर्षापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. मात्र, अवघे तीन-चार महिनेच हे सीसीटीव्ही सुरू राहिले. गेल्या वर्षभरापासून ते बंद पडलेले आहेत. त्याच्या दुरुस्तीकडे कुणीही लक्ष दिलेले नाही हे विशेष. आज सीसीटीव्ही सुरू असते तर बाळचोर महिलेला शोधणे शक्य झाले असते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.