होमपेज › Aurangabad › कचरा डेपो वाळूजजवळ

कचरा डेपो वाळूजजवळ

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 1:52AMऔरंगाबाद : सुनील कच्छवे

डेपोचा प्रश्‍न गंभीर बनल्याने मनपाने यावर खासगीकरणाचा उपाय शोधला आहे. पालिकेने शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट खासगी कंपनीला देण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. तीन कंपन्यांनी स्वतःच्या जागेत कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची तयारी दर्शविली होती. त्यातील सर्वांत कमी दर भरलेल्या कंपनीची वाळूजजवळ जागा असून तिथेच नवीन कचरा डेपो होण्याची शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. 

नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी शुक्रवार, दि. 16 फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. शुक्रवारपासून कचर्‍याची एकही गाडी डेपोत येऊ दिली जाणार नाही, असे या गावकर्‍यांनी जाहीर केले आहे. यापूर्वीही ऐन दिवाळीच्या तोंडावर नारेगाव परिसरातील नागरिकांनी आंदोलन छेडले होते, त्यावेळी सलग तीन दिवस कचर्‍याची एकही गाडी डेपोत जाऊ शकली नव्हती. त्यामुळे शहरात सर्वत्र कचर्‍याचे ढीग साचले होते. मात्र त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या मध्यस्तीमुळे गावकर्‍यांनी मनपाला पर्यायी व्यवस्थेसाठी आधी तीन महिन्यांची आणि नंतर आणखी एक महिन्याची मुदत दिली होती. आता ही मुदत 16 फेब्रुवारी रोजी संपत आहे. 

आंदोलकांकडून वाढीव मुदत मिळणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने मनपाने आता खासगीकरणाचा पर्याय शोधला आहे. शहरातील कचरा नेऊन स्वतःच्या जागेत विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार ग्रीन इंडिया, अग्रवाल, अयुरंश बिल्डकॉन या तीन कंपन्यांनी मनपाकडे प्रस्ताव दाखल केले. मनपाच्या सफाई कामगारांनी गोळा केलेला कचरा नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची या कंपन्यांची तयारी आहे. कचरा नेण्यासाठी यातील एका कंपनीने सर्वांत कमी म्हणजे 750 रुपये प्रतिटन खर्च मागितला आहे. या कंपनीने वाळूजजवळ स्वतःच्या मालकीची 25 एकर जमीन असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याच जमिनीत कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मनपातील सत्ताधार्‍यांनी याच कंपनीला कचर्‍याचे कंत्राट देण्याचे जवळपास निश्‍चित केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वर्षाला 12 कोटींचा खर्च
मनपाकडे दाखल प्रस्तावानुसार शहरातील कचरा संकलनाचे काम मनपाचेच सफाई कामगार करतील. पुढे संबंधित कंपनी हा संकलित केलेला कचरा त्यांच्या जागेत घेऊन जाईल. हा कचरा नेण्यासाठी सर्वांत कमी म्हणजे प्रतिटन 750 रुपये असा दर मागण्यात आला आहे. शहरात दररोज सुमारे 450 टन कचरा निघतो. या दराने वर्षाचा खर्च काढल्यास तो 12 कोटींच्या घरात जाणार आहे. 

रॅम्कीचा प्रयोग फसला
मनपाने 2010-11 मध्ये हडको-सिडकोतील 22 वॉर्ड वगळून उर्वरित शहरातील कचरा संकलनाचे काम रॅम्कीला दिले होते. त्यावेळी महिन्याला 90 लाख याप्रमाणे वर्षाकाठी 11 कोटी रुपये रॅम्कीला देण्यात येत होते. 23 महिने रॅम्कीने हा काम नियमितपणे केले. मात्र त्यानंतर वाटाघाटीत बिनसल्यामुळे रॅम्कीने हात वर केले. रॅम्कीचे राम शेट्टी, योगेशकुमार आणि पालिकेचे पदाधिकारी यांच्यात समन्वयासाठी त्यावेळी 10 बैठकाही झाल्या, परंतु त्यातून मार्ग निघाला नव्हता.