होमपेज › Aurangabad › नारेगावकरांनी घातले मनपाचे दहावे

नारेगावकरांनी घातले मनपाचे दहावे

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 1:09AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कचर्‍याच्या प्रश्‍नावर एवढी वर्षे झोपेत राहिलेल्या मनपा प्रशासनाचा रविवारी नारेगाव येथील आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला. कचरा डेपो बंदीच्या आंदोलनाचा रविवारी दहावा दिवस होता. हेच निमित्त साधून आंदोलकांनी मुंडण करून मनपाचे दहावे घातले.

शहरातील कचरा साठविण्यासाठी प्रशासनाने चाळीस वर्षांपूर्वी नारेगाव परिसरात कचरा डेपो थाटला. तेव्हापासून शहरातील कचरा दररोज तिथे टाकला जात आहे. त्यामुळे आज या ठिकाणी कचर्‍याचे मोठमोठे डोंगरे उभे राहिले. येथे कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून या भागातील हवा, पाणी, जमीन प्रदूषित झाली आहे. शिवाय कचर्‍यावरील मोकाट कुत्र्यांच्या झुंडींमुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून नारेगाव पंचक्रोशीतील लोकांनी 16 फेब्रुवारीपासून कचरा डेपो बंद आंदोलन पुकारले आहे. दहा दिवसांपासून हे आंदोलक मांडकी चौफुलीवर ठाण मांडून बसले आहेत. या दहा दिवसांत कचरा डेपोत मनपाची कचर्‍याची एकही गाडी गेलेली नाही. आज आंदोलनाचा दहावा दिवस होता. त्यामुळे आंदोलकांनी याच ठिकाणी मनपाचे दहावे घालून प्रशासनाचा निषेध केला. आम्ही तीस-चाळीस वर्षांपासून नरकयातना भोगत आहोत. पालिकेने या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आतापर्यंत काहीही केले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाचा मृत्यू झाला आहे, अशी आमची धारणा झाली आहे. म्हणून मनपाचे आज येथे दहावे घालण्यात आले असे आंदोलकांनी सांगितले. यावेळी पुंडलिक अंभोरे, डॉ. शिवाजी डक, मनोज गायके, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील हरणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.