होमपेज › Aurangabad › मनपाची नोकर भरती संकटात; आयोगाची मान्यता रखडली

मनपाची नोकर भरती संकटात; आयोगाची मान्यता रखडली

Published On: Aug 20 2018 1:35AM | Last Updated: Aug 20 2018 1:34AMऔरंगाबाद : सुनील कच्छवे


महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पालिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या नोकर भरतीसाठी पालिकेने बिंदू नामावली तयार करून दीड महिन्यापूर्वीच ती मान्यतेसाठी मागासवर्गीय आयोगाकडे सादर केली. त्यावर आयोगाने मागील सात वर्षांत पालिकेत कोणत्या प्रवर्गातील किती पदे भरली, याची सविस्तर माहिती मागविली आहे. मात्र, पालिकेकडे त्याचे रेकॉर्डच उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या या रेकॉर्डची जुळवाजुळव सुरू आहे.

महानगरपालिकेतील विविध संवर्गातील सुमारे सहाशे पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होतो आहे. महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न आहे. त्याकरिता प्रशासनाकडूनही दोन महिन्यांपासून हालचाली सुरू झाल्या आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने आधी कर्मचार्‍यांची बिंदू नामावली तयार केली. त्यास मागासवर्गीय आयोगाची मान्यता आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने जून महिन्याच्या शेवटी ही बिंदू नामावली मागासवर्गीय आयोगाकडे सादर केली. मात्र, त्यासोबत याआधी भरलेल्या पदांची माहिती नव्हती. त्यामुळे आयोगाने 2011 सालापासून पालिकेने कोणत्या संवर्गातील किती पदे भरली आणि ती कोणत्या प्रवर्गातून भरली, याची माहिती मागविली आहे; परंतु मनपाकडे सध्या हे रेकॉर्डच उपलब्ध नाही. त्यामुळे बिंदू नामावलीस आयोगाची मान्यता मिळणे रखडले आहे. आता पालिकेने या रेकॉर्डची जुळवाजुळव सुरू केली आहे. आगामी मनपा निवडणूक ही एप्रिल 2020 मध्ये आहे. त्याआधी नोकर भरतीची ही कार्यवाही पूर्ण व्हावी, असा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न आहे. पालिका निवडणुकीला दीड वर्षाचा अवकाश असला तरी त्याआधी लोकसभा निवडणुकीची आणि नंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे.