Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Aurangabad › मनपा कर्मचारीच आग‘लावे’

मनपा कर्मचारीच आग‘लावे’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

कचरा जाळाल तर खबरदार, गुन्हे नोंदवू, अशी धमकी शहरवासीयांना देणार्‍या मनपा प्रशासनाचे कर्मचारीच कचरा उचलून नेण्याऐवजी तो जागच्या जागी पेटवून धोकादायक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावत असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. विशेष म्हणजे मनपा कर्मचार्‍यांच्या या धोकादायक कृत्याचा फटका मोंढ्यातील एका व्यापार्‍याला बसला. दुकानासमोर लोकांनी आणून फेकलेल्या कचर्‍याच्या ढिगाला मनपा कर्मचार्‍याने आग लावली. या आगीत कचर्‍याबरोबरच  व्यापार्‍याचे संपूर्ण दुकानही जळून खाक झाले. दुकानातील बारदाना जळून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेवरून शास्त्रोक्‍त पद्धतीने कचरा विल्हेवाटीचा मनपाचा दावा कसा खोटा आहे, हे दिसून आले. 

त्याचे झाले असे की, अजबनगरातील रहिवासी असलेल्या शिवसेना गटप्रमुख जिग्नेश शंभूलाल भानुशाली यांचे जुन्या मोंढ्यात बरदाना विक्रीचे मोठे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर परिसरातील नागरिक दररोज रात्री गुपचूप कचरा आणून टाकतात. या कचर्‍यामुळे आसपासचे व्यापारी त्रस्त झालेले आहेत. नित्याप्रमाणे रविवारी रात्री आणि पहाटेच्यावेळी भानुशाली यांच्या दुकानासमोर कचरा आणून टाकण्यात आला. तेथे मोठा ढीग साचला होता. येथील व्यापार्‍यांना त्रास होतो म्हणून कचरा उचलून नेण्याची जबाबदारी मनपाच्या साफसफाई कामगारांना सोपविण्यात आली आहे. कर्मचारी येथे दररोज सकाळी सकाळी रिक्षा घेऊन येत असत. कधी कधी रिक्षात कचरा भरून नेत, तर कधी तेथेच गुपचूप या कचर्‍याला आग लावून तो नष्ट करीत होते. 

जाळपोळ सीसीटीव्हीत कैद

दुकानाला आग नेमकी कशी लागली हे पाहण्यासाठी नंतर परिसरातील व्यापार्‍यांनी बाहेर लावलेल्या सीसीटीव्हींची तपासणी केली. तेव्हा समोर आलेली बाब धक्‍कादायकच होती. खुद्द मनपा कर्मचार्‍यांनीच कचर्‍याला ही आग लावली होती. कचर्‍याच्या आगीमुळे नंतर दुकानाने पेट घेतला, असे या सीसीटीव्हीवरून स्पष्ट झाले. 

मनपाच जबाबदार, नुकसान भरपाई द्या

या घटनेला महानगरपालिकाच जबाबदार आहे. मनपा कर्मचार्‍यांच्या या धोकादायक कृत्यामुळे भानुशाली यांचे दुकान जळून खाक झाले. त्यांची संपूर्ण नुकसान भरपाई महानगरपालिकेने द्यावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात व उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिला. 

‘पुढारी’च्या वृत्तावर शिक्‍कामोर्तब

मनपा प्रशासन कचर्‍याची शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लावत असल्याचा दावा खोटा आहे. मनपा कर्मचारीच जागच्या जागी कचरा पेटवून धोकादायक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावत आहेत. कचर्‍याला अशा आगी लावण्याच्या महिनाभरात शहरात शंभर घटना घडल्याची नोंद मनपाच्याच अग्निशमन विभागात झाली आहे. विशेष म्हणजे या कृत्यामुळे अग्निशमन विभागाची चांगलीच धावाधाव होते आहे. दररोज कोठे ना कोठे मनपा कर्मचारी असा कचरा पेटवून देत असून त्यामुळे आजूबाजूची दुकाने, घरांना आग लागण्याचा धोका वाढत आहे. रविवारच्या अंकात दैनिक ‘पुढारी’ने हे वृत्त प्रकाशित केले होते.


  •