Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Aurangabad › ‘नेट’साठी 5 मार्चपासून ऑनलाइन अर्ज

‘नेट’साठी 5 मार्चपासून ऑनलाइन अर्ज

Published On: Mar 01 2018 9:53AM | Last Updated: Mar 01 2018 9:53AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जुलैत होणार्‍या यूजीसी राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (नेट) बुलेटिन (सविस्तर अधिसूचना) शुक्रवारी जारी केले. त्यानुसार ही परीक्षा 8 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी 5 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येईल. 6 एप्रिल ही परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठातील सहायक प्राध्यापकपदाचे पात्र उमेेदवार ठरविण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. यावेळी 84 विषयांसाठी देशभरातील एकूण 91 शहरांत ही परीक्षा होणार आहे. 

यूजीसीने नेटच्या नियमावलीत केलेल्या दुरुस्तीनुसार सीबीएसईने हे बुलेटिन तयार केले आहे. यावेळी 30 वर्षांचे उमेदवार ज्युनिअर रिसर्च फेलोशिपला पात्र असतील. पूर्वी ही वयोमर्यादा 28 होती. त्याचबरोबर यावेळी परीक्षेत तीन प्रश्‍नपत्रिकांऐवजी दोनच प्रश्‍नपत्रिका असतील. या प्रश्‍नपत्रिका अनुक्रमे 100 आणि 200 गुणांच्या असतील. पहिल्या प्रश्‍नपत्रिकेत प्रत्येकी दोन गुणांचे 50, तर दुसर्‍या प्रश्‍नपत्रिकेत प्रत्येकी दोन गुणांचे 100 प्रश्‍न राहणार असून ते सोडविण्यासाठी अनुक्रमे एक आणि दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. 

परीक्षेच्या अडीच तास आधी यावे लागेल

परीक्षार्थींना परीक्षा सुरू होण्याच्या अडीच तास आधी परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल. परीक्षा साडेनऊ वाजता सुरू होणार असल्यामुळे परीक्षार्थींना सकाळी सात वाजताच परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. अ‍ॅडमिशन कार्डसोबत (हॉल तिकीट) स्वतःचे फोटो ओळखपत्र आणावे लागेल. अ‍ॅडमिशन कार्ड जूनच्या तिसर्‍या आठवड्यात संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याची प्रिंट काढावी लागेल. ते पोस्टाने पाठविले जाणार नाही. ऑनलाइन अर्जातील माहिती चुकली असेल तर 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान त्यात दुरुस्ती करता येऊ शकेल. ओएमआर शिटवरील योग्य उत्तराचा पर्याय काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनने काळा करावा लागेल. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाची (कन्फर्मेशन) प्रिंट काढून स्वतःकडे ठेवावी. ही प्रिंट सीबीएसईला पाठविण्याची गरज नाही. 

घड्याळ नेता येणार नाही

परीक्षार्थींना कॅलक्युलेटर, लॉगटेबल, इलेक्ट्रॉनिक वस्तू एवढेच नाही तर घड्याळही परीक्षा केंद्रात नेता येणार नाही. वेळ समजावी म्हणून प्रत्येक हॉलमध्ये घड्याळाची व्यवस्था असेल. 

वैशिष्ट्ये

> निगेटिव्ह मार्किंग नाही. सर्व प्रश्‍न वस्तुनिष्ठ, सोडविणे बंधनकारक.
> एकूण परीक्षार्थींपैकी सर्वाधिक गुण मिळविणारे सहा टक्के उमेदवार पात्र ठरतील. 
> परीक्षा शुल्क केवळ डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा ई-चालान याद्वारे स्वीकारले जाईल. मनिऑर्डर, चेक किंवा डीडीच्या स्वरूपातील शुल्क चालणार नाही. 
> परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग - 1000 रुपये
ओबीसी - 500 रुपये
एससी,एसटी - 250 रुपये