Mon, May 27, 2019 09:49होमपेज › Aurangabad › महापौरांवर भिरकावल्या बजेटच्या प्रती

महापौरांवर भिरकावल्या बजेटच्या प्रती

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 30 2018 12:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महापालिकेचे 2017-18 चे वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास सभापती गजानन बारवाल यांना शहर विकास आघाडीतून बाहेर पडलेल्या गटाकडून विरोध करण्यात आला. या नगरसेवकांनी सभापती हाय-हाय, महापौर हाय-हाय, धिक्‍कार असो अशा घोषणा देत सभागृहात गोंधळ घातला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सूचना देऊनही हुल्लडबाजी करीत अर्थसंकल्पाच्या प्रती भिरकावणार्‍या ‘त्या’ चार नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आले.

मनपा स्थायी समितीच्या निवृत्त होणार्‍या सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची तीन दिवसांपूर्वी नियुक्‍ती करण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते तथा मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही बंद पािकिटात पुन्हा स्वतःच्याच नावाची शिफारस केली. त्यामुळे शहर विकास आघाडीत त्या दिवशी फूट पडली. या गटाच्या सदस्यांनी रविवारी (दि. 29)  विशेष बैठकीमध्ये सभापती बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याला विरोध केला. मावळते सभापती बारवाल हे खोटारडे आहेत, त्यांनी शहर विकास आघाडीतील सदस्यांचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अंदाजपत्रक सादर करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी नगरसेवक कैलास गायकवाड, गोकूळ मलके यांनी लावून धरली; परंतु महापौर घोडेले यांनी नियमाप्रमाणे तसे करता येत नाही, ही अर्थसंकल्पीय विशेष सभा असल्याचे सांगत सभापती बारबाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यासाठी पाचारण केले. यावेळी आघाडीचे नगरसेवक कैलास गायकवाड, गोकूळ मलके, राहुल सोनवणे व रमेश जायभाये यांनी याला जोरदार विरोध करत घोषणाबाजी सुरू केली.

महापौर नंदुकमार घोडेले यांनी या नगरसेवकांना शांत राहण्याच्या वारंवार सूचना केल्या. मात्र, त्यांनी डायससमोर जाऊन सभापती हाय-हाय, महापौर हाय-हाय अशा घोषणा देत सभापतींच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच महापौर घोडेले हे पक्षपात करत असल्याचा आरोप करून या नगरसेवकांनी बजेटच्या प्रती डायसवर भिरकावल्या. त्यामुळे महापौर घोडेले यांनी चारी नगरसेवकांचे एक दिवसासाठी निलंबन केले.

दरम्यान, सभापती बारवाल यांनी 1 हजार 476 कोटी 72 हजार उत्पन्न यामध्ये 1 हजार 475 कोटी 87 लाख 30 हजार खर्च आणि 13 लक्ष 42 हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. विशेष सभेत केवळ वार्षिक अंदाजपत्रकाचा स्वीकार करण्यात आला. लवकरच सभा बोलावून या अंदाजपत्रकावर चर्चा केली जाईल, असे महापौरांनी सांगतिले.

महापौरांच्या दबावामुळे माहिती देण्यास टाळाटाळ; नगरसेवक गायकवाड यांचा आरोप

महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवृत्त सदस्यांच्या जागी आठ नव्या सदस्यांची 26 एप्रिलला निवड झाली. यावेळी स्थायी समिती सदस्य निवडीच्या सभेचे इतिवृत्त तत्काळ देण्याची मागणी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी नगरसचिव दिलीप सूर्यवंशी यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी केली, मात्र तीन दिवसांनंतरही माहिती मिळत नसल्याने नगरसचिव सूर्यवंशी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दबावामुळे माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी रविवारी दि. 29 केला.

रविवारी बजेटची विशेष सभा होताच गायकवाड यांनी नगरसचिवांकडे इतिवृत्ताची पुन्हा मागणी केली, मात्र तांत्रिक अडचणींमुळे इतिवृत्त तयार झाले नसल्याचे नगरसचिवांनी त्यांना सांगितले. यावर गायकवाड यांनी महापौरांच्या दबावातून इतिवृत्त देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप माध्यम प्रतिनिधींसमोर केला. एकतर इतिवृत्त द्या किंवा महापौरांच्या दबावातून ते देत नसल्याचे लेखी द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर नगरसचिवांनी इतिवृत्त तयार झाले की लगेच देतो, असे सांगितले.