Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Aurangabad › वाहतुकीच्या चर्चासत्रात महापालिका टार्गेट

वाहतुकीच्या चर्चासत्रात महापालिका टार्गेट

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 12:58AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरात वाहतुकीबाबत काहीही नियोजन नाही. पार्किंगच्या जागा निश्‍चित नाहीत. हॉकर्स झोन नाही, चौक विद्रूप झालेत, चालकही मनाला वाटेल तसे वाहन चालवितात, रस्ते अरुंद झाले तरी अतिक्रमण काढले जात नाही या सर्वच गोष्टींमुळे वाहतुकीची वाट लागली असून याला महापालिकेचे बोगस नियोजन कारणीभूत असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. तापडिया नाट्यमंदिरात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता आयोजित वाहतूक चर्चासत्रात अनेकांनी मनपावर खापर फोडून विविध समस्यांचा काथ्याकूट केला. सोबतच वाहतुकीवर चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल अनेकांनी प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांचे आभार मानले.  या चर्चासत्रात व्यापारी महासंघ, रिक्षा चालक, अवजड वाहनधारक संघटना, टॅक्सी चालक संघटना, वाळू वाहतूकदार, वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह नागरिकांनी हजेरी लावली. आ. संजय सिरसाट, इम्तियाज जलील यांनीही हजेरी लावून वाहतुकीची समस्या सुटली पाहिजे, अशी मागणी केली.  

या चर्चासत्रात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, हॉकर्स झोन, सिग्‍नलचे टायमर, दिशादर्शक आदी मुद्द्यांवर काथ्याकूट केला. अनेकांनी वाहतुकीच्या वेगवेगळ्या समस्या मांडत मनपाला टार्गेट केले. मराठवाडा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक सुग्रीव मुंढे, माजी महापौर रशीद मामू, एमआयएमचे नगरसेवक अज्जू नाईकवाडी, व्यापारी युसूफ मुकाती, लच्छु पहेलवान बाखरिया, विशेष पोलिस अधिकारी विवेक चोबे यांच्यासह विविध मान्यवरांनी शहरातील हातगाड्यांची समस्या, रिक्षाचालकांची बेशिस्त वागणूक, रिक्षाचालकांकडून होणार्‍या नियमांचा भंग, वाहतूक शाखा पोलिसांकडून करण्यात येणार्‍या नो-पार्किंगमधील दुचाकीवरील कारवाई आदी विषयावर सूचना मांडल्या. यावेळी उपायुक्‍त राहुल श्रीरामे, विनायक ढाकणे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्‍त चंपालाल शेवगण, ज्ञानोबा मुंडे, गोवर्धन कोळेकर, डॉ. नागनाथ कोडे, हनुमंत भापकर यांच्यासह सर्व पोलिस निरीक्षकांची उपस्थिती होती. 

Tags : Aurangabad, Municipal, Council, targets,  traffic, conference