Sun, Aug 25, 2019 01:29होमपेज › Aurangabad › मनपात ऐकावं ते ‘नवल’च

मुगळीकरांनी रोखलेल्या संचिका राम यांच्याकडून निकाली

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 24 2017 1:07AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

महानगरपालिका आयुक्‍त दीपक मुगळीकर यांनी बाजूला ठेवलेल्या अनेक संचिकांपैकी काही संशयास्पद संचिका मागील महिनाभरात प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर यांच्याकडून निघाली काढण्यात आल्या आहेत. पालिकेतील अधिकार्‍यांनी झीरो पेंडन्सीच्या नावाखाली फाईलांमध्ये फाईली टाकून राम यांच्याकडून या संचिकांवर  स्वाक्षर्‍या घेतल्या. या सह्या घेताना आधीच्या आयुक्‍तांनी त्या संचिका बाजूला ठेवल्याची कल्पनाही त्यांना देण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

मनपा आयुक्‍त मुगळीकर हे महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी 15 नोव्हेंबर रोजी मसुरीला रवाना झाले होते. तेव्हापासून 20 डिसेंबरपर्यंत आयुक्‍तपदाचा पदभार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे सोपविण्यात आला होता. प्रशिक्षणाला जाण्यासाठी अधिकार्‍यांनी विविध कामांच्या असंख्य संचिका मुगळीकरांकडे सह्यांसाठी पाठविल्या होत्या, परंतु मुगळीकर यांनी त्यातील महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक कामांच्या संचिकांवर सह्या केल्या होत्या.

ज्या संचिकांमध्ये त्रुटी होत्या, ज्या संचिकांविषयी साशंकता होती किंवा जी कामे अत्यावश्यक नव्हती अशा अनेक संचिका त्यांनी बाजूला काढल्या होत्या. राम यांनी पदभार स्वीकारताच पालिकेतील काही चाणाक्ष अधिकार्‍यांनी संधी साधली. मुगळीकरांनी प्रलंबित ठेवलेल्या अनेक संचिका त्यांनी राम यांच्याकडे नेल्या. राम यांनीही पहिल्याच दिवशी झीरो पेंडन्सीवर भर दिला होता. त्याचा फायदा घेत अनेक संचिकांवर या अधिकार्‍यांनी प्रभारी आयुक्‍तांच्या सह्या घेतल्या. या सह्या घेताना आधीच्या आयुक्‍तांनी त्या संचिका बाजूला ठेवल्या होत्या, याची कल्पनाही त्यांना देण्यात आली नाही. 

टीडीआर, बदल्या आणि बरेच काही

मनपातील चाणाक्ष अधिकार्‍यांनी किती तरी वादग्रस्त संचिका मंजूर करून घेतल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने टीडीआर, बांधकाम परवानगी, कर्मचार्‍यांच्या बदल्या आदींचा समावेश आहे. यातील दोन टीडीआर प्रकरणांत पुरेसे पुरावे नसल्याने मुगळीकरांनी ते बाजूला ठेवले होते. त्यावर नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांनी राम यांच्या सह्या घेतल्या, परंतु सह्या झाल्यानंतर काही दिवसांतच राम यांना या संचिका मुगळीकरांनी बाजूला ठेवलेल्या होत्या याची माहिती मिळाली.

त्यानंतर त्यांनी त्या संचिका फेरतपासणीसाठी मागवून घेेतल्या. एप्रिल महिन्यात तत्कालीन आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी पालिकेत एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या काही अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. मुगळीकर आयुक्‍त म्हणून आल्यानंतर यातील काही अधिकारी, कर्मचार्‍यांनी पुन्हा पूर्वीच्याच जागेवर जाण्यासाठी बदल्या रद्द करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न फोल ठरले. ते प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर पालिकेतील काही अधिकार्‍यांनी राम यांच्या स्वाक्षरीने चार अधिकारी, कर्मचार्‍यांना पुन्हा पूर्वीच्याच जागेवर पाठविले, मात्र ही बाब समोर आल्यावर आता मुगळीकर यांनी त्या चार बदल्या रद्द केल्या आहेत.