Tue, Jul 16, 2019 10:18होमपेज › Aurangabad › खड्डे बुजवण्यास आणखी एका नव्या प्रयोगाच्या हालचाली

खड्डे बुजवण्यास आणखी एका नव्या प्रयोगाच्या हालचाली

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 13 2018 12:37AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

दीड महिन्यापूर्वी मनपा प्रशासनाने शहरातील खड्डे बुजवण्यासाठी तीन कोटींचा चुराडा केल्यानंतर आता पुन्हा शास्त्रोक्‍त पद्धतीने खड्डे बुजवण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी पुण्याच्या एका कंपनीला पाचारण करण्यात आले असून, शुक्रवारी या कंपनीच्या लोकांनी दोन खड्डे बुजवून आपल्या कामाचे सादरीकरण केले. एक बाय एक आकाराचा खड्डा बुजवण्यासाठी सुमारे अडीच हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्‍त करण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी 15 डिसेंबरची मुदत दिली होती. या मोहिमेच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने शहरातील खड्डे बुजवण्याचे काम केले. त्यासाठी प्रत्येक प्रभागाला 50 लाख याप्रमाणे साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी खड्डे बुजवण्याच्या कामावर 3 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतरही शहरातील रस्ते खड्डेमुक्‍त झाले की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. खड्डे बुजवताना नुसते डांबर टाकल्याने अनेक रस्त्यांवर लहान-लहान डोंगरच तयार झाले आहेत. खड्ड्यांत गचके खाणारी वाहने आता या डोंगरांमुळे गचके खात आहेत. त्यामुळे शास्त्रोक्‍त पद्धतीने हे खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली आहे.

त्यासाठी पुणे येथील डिंपल केमिकल कंपनीने शुक्रवारी महापौर बंगल्यासमोरील खड्डे बुजवण्याचे सादरीकरण केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक राहुल सोनवणे, आयुक्‍त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, डी. पी. कुलकर्णी यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

या कामाबाबत कंपनीचे आबा काळे म्हणाले, आमच्या कंपनीने पीआयसीसी तंत्रज्ञान विकसित केले असून, सध्या पुणे मनपात आम्ही काम करत आहोत. मुंबईत जेएनपीटीवरील खड्डेदेखील बुजवले आहेत. डांबरी व सिमेंट रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगी असून, खड्डा विशिष्ट आकारात केल्यानंतर त्यात केमिकल टाकून कंपनीने तयार केलेल्या तंत्रज्ञानाने सिमेंट खडी मिक्स करून तो खड्डा बुजवला जातो. त्यामुळे रस्त्याचा सरफेस बरोबर होतो. एकदा खड्डा बुजवल्यानंतर किमान तीन वर्षे त्या ठिकाणी खड्डा पडणार नाही, असा दावाही काळे यांनी केला आहे. 

हे सादरीकरण पाहिल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, हे तंत्रज्ञान खूपच खर्चिक असले तरी वारंवार खड्डे पडणार्‍या रस्त्यावर व मोठ्या खड्डयांसाठी ते वापरता येईल का? याची चाचपणी करण्यात येईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.