Thu, Jun 27, 2019 01:40होमपेज › Aurangabad › नोकर भरतीवरील बंदीविरुद्ध आंदोलन

नोकर भरतीवरील बंदीविरुद्ध आंदोलन

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 1:28AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नोकर भरतीवरील बंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरुवारी (दि. 15) अभ्यास चालू ठेवा या शीर्षकाखाली अनोखे आंदोलन केले. यात विद्यार्थी कार्यकर्तेच नाही तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, डी.एड., बी. एड., नेट-सेट व पीएच.डी.धारक तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आंदोलकांनी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाचन करण्यासह पदवीची प्रतीकात्मक होळी केली. नोकरीच नाही तर पदवीचा उपयोग काय असा सवाल यावेळी त्यांनी केला. 

राज्यातील बेरोजगारीच्या समस्या दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. याचे वास्तव ‘दै. पुढारी’ दुष्काळ रोजगाराचा या वृत्तमालिकेद्वारे मांडत आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केले. सरकारने नोकर्‍यांवर गंडांतर आणले असले तरी आपण अभ्यास सुरूच ठेवायचा असा संकल्प सोडत आंदोलकांनी ठिय्या मारला. नोकरी मिळेल या आशेने विद्यार्थी विद्यापीठाच्या ग्रंथालयात बारा-बारा तास अभ्यास करीत आहेत. मात्र, नोकरीची संधी दिसत नसल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. आंदोलनाने त्यांच्या अस्वस्थतेला वाट करून दिली. नोकरी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, भरती झालीच पाहिजे, आम्हाला शिकू द्या, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. त्यांनी सरकारचा निषेध करणार्‍या घोषणांचे फलक हाती घेतले होते. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने कुलगुरूंना निवेदन दिले. सुशिक्षित बेरोजगारांना नोकर्‍या नाहीत, त्यांना बँका, संबंधित महामंडळांकडून कर्ज पुरवठा होत नाही, पूर्वीच्या सरकारकडून उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी राबविण्यात येणार्‍या योजना टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 30 टक्के मंजूर पदांची कपात करण्याचा रझाकारी निर्णय घेतला.

भरतीवरील बंदी उठवावी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी परीक्षा घ्यावी. रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. ती तातडीने भरावीत. त्यामुळे बेरोजगारीची समस्या काही प्रमाणात दूर होईल. 
- रमेश कळंबे (शिक्षण एम. ए. अर्थशास्त्र, स्पर्धा परीक्षेची तयारी)


परीक्षा शुल्क कमी करावे
पीएसआय, एसटीआयची पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी. परीक्षा शुल्क कमी करावे. तलाठी भरती जिल्हा प्रशासनाकडून न करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करावी. 
- सोनाजी गवई (शिक्षण एम. ए. अर्थशास्त्र, स्पर्धा परीक्षेची तयारी)