Fri, Jul 19, 2019 23:14होमपेज › Aurangabad › किडनी दान करून मुलाला पुनर्जन्म

किडनी दान करून मुलाला पुनर्जन्म

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:31AMऔरंगाबाद : जितेंद्र विसपुते

बाळंतपणाच्या कठीण यातना सोसून मुलाला जन्म दिला. त्याचे संगोपन केले. मुलगा 22 वर्षांचा झाला आणि अचानक त्याच्या दोघेही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. कुटुंबावर संकटाचा आघात झाला. मुलाच्या दीर्घायुष्याकरिता आईने तिची एक किडनी देण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण कुटुंब पिंप्री गवळी (ता. खामगाव, जि. बुलडाणा) येथून औरंगाबादेत स्थलांतरित झाले. ठरल्यानुसार 29 जून रोजी दोघांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोघे अद्याप रुग्णालयातच असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. लीलाबाई तुळशीराम काळे (वय 53) असे मुलाला पुनर्जन्म देणार्‍या आईचे नाव आहे. 

लीलाबाई व तुळशीराम काळे दाम्पत्याला तीन मुली आणि दोन मुले आहेत. तीन मुलींच्या पाठीवर त्यांना विष्णू (मोठा मुलगा वय 23 वर्षे) झाला. सर्वकाही सुरळीत चालले होते. विष्णूचे मागील वर्षी नगर येथे शिक्षण सुरू होते. 

हलाखीची परिस्थिती असल्याने तो काम करून पदवीचे (टीवायबीए) शिक्षण घेत होता. त्याला फौजदार व्हायचे होते. त्यादृष्टीने त्याची तयारी सुरू होती. मात्र, अचानक त्याला अशक्‍तपणाचा त्रास जाणवू लागला. यानंतर उपचार केले असता विष्णूच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याचे समोर आले आणि काळे कुटुंबावर संकटाचे आभाळ कोसळले. लहान भाऊ जीवन अकरावीत शिकत होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच विष्णूच्या वडिलांवर (तुळशीराम काळे) मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे काळे कुटुंब नुकतेच एका मोठ्या अडचणीचा सामना करून बाहेर पडलेले होते. विष्णूला झालेला आजार कुटुंबीयांवर मोठा आघात करणारा होता. मात्र, त्यांनी याची कधी विष्णूला जाणीव होऊ दिली नाही.

एक किडनी दिल्याशिवाय गत्यंतर नाहीच हे स्पष्ट झाल्यानंतर आई लीलाबाई यांनी मुलाला आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी पूर्वउपचारासाठी काळे कुटुंबीय आपले गाव सोडून औरंगाबादेत (श्रीकृष्णनगर, सहकार बँक कॉलनी) स्थलांतरित झाले. ठरल्यानुसार 29 रोजी आई-मुलावर शहरातील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

कर्जाचा डोंगर हटविण्यासाठी विकली जमीन...

विष्णूच्या उपचाराचा खर्च दरमहा पंधरा हजार रुपये इतका होता. शिवाय आपल्या आजारपणातही काही उसनवारी होती. यामुळे तुळशीराम काळे यांनी तीन एकर जमीन विकली. त्यातून अगोदर झालेला कर्जाचा बोजा उतरला आणि विष्णू व लीलाबाई यांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले पैसेही मिळाले. मात्र, ही रक्‍कमही अत्यल्प ठरली. मुलाचा खर्च भरून निघाला, मात्र पत्नीच्या उपचारासाठी होणारा खर्च तुळशीराम काळे यांच्याकडे नव्हता. यामुळे ते तणावात होते. ही बाब त्यांच्या तीन जावयांनी ओळखली. उपचारासाठी आवश्यक रक्‍कम त्यांनी आपल्या सासर्‍यांकडे आणून दिली. आपल्या सासू आणि मेहुण्याच्या उपचाराला आर्थिक मदत उपलब्ध करून देत काळे यांच्या जावयांनी, माहेरातून पैसे आणावेत म्हणून पत्नीचा, सुनेचा छळ करणार्‍यांना जोरदार चपराक लगावली आहे.