Sun, Apr 21, 2019 02:21होमपेज › Aurangabad › आई मारते, अभ्यास करू देत नाही म्हणून मुलीने सोडले घर

आई मारते, अभ्यास करू देत नाही म्हणून मुलीने सोडले घर

Published On: Dec 18 2017 2:28AM | Last Updated: Dec 17 2017 11:47PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

दहावीचे वर्ष असल्याने मला अभ्यास करायचाय, पण आई काम सांगते, ऐकले नाही तर  मारहाण करते. त्यामुळे 16 वर्षीय मुलीने चक्क घर सोडून राहणे पसंत केले, परंतु ती कोणालाही न सांगता गायब असल्याने वडिलांच्या तक्रारीवरून छावणी ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी यंत्रणा कामाला लावून तिचा शोध घेतला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोमल (नाव बदललेले आहे, पडेगाव) आई, एक मोठा आणि एक लहान भावासोबत राहते. वडील नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. तीन, चार महिन्यांनंतर घरी येतात. आईच या मुलांचा सांभाळ करते. कोमल दहावीत असल्याने तिचे अभ्यासाकडे चांगले लक्ष आहे, परंतु तिला आई घरातील कामे सांगते. ऐकले नाही तर रागवते. वेळप्रसंगी मारहाणही करते. 13 डिसेंबरच्या रात्रीही आई तिला रागावली होती. त्यामुळे 14 डिसेंबर रोजी कोमल सकाळी सव्वासात वाजता शाळेत जायचे म्हणून घराबाहेर पडली. ती शाळेत गेली, परंतु शाळा सुटल्यावर घरी पोहोचलीच नाही. 14, 15 आणि 16 डिसेंबरला नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून आली नाही. अखेर, 16 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून छावणी ठाण्यात कोमलच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी घेतला शोध

कोमलचा (नाव बदललेले आहे) तीन दिवस शोध घेतल्यानंतर ती कुठेच मिळून आली नाही. त्यानंतर नातेवाईकांनी छावणी ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक सचिन मिरधे यांनी तपासाची चक्रे फिरवून कोमलचा शोध घेतला. पेठेनगरात ती मिळून आली. रविवारी तिचा जबाब नोंदविल्यावर पोलिसांनी कोमलला नातेवाईकांच्या स्वाधीन केले. 

मुले, असा निर्णय का घेतात?

16 डिसेंबर रोजी अपहरणाचे दोन गुन्हे नोंद आहेत. राजनगर, मुकुंदवाडी भागातील एका विद्यार्थी ट्यूशनला जातो म्हणून बाहेर पडला तो घरी परतलाच नाही. तसेच, कोमलही शाळेतून पुन्हा घरी पोहोचली नाही. आजची मुले असा निर्णय का घेतात? असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.