Sun, Oct 20, 2019 11:24होमपेज › Aurangabad › धक्कादायक; आईने पाण्यात बुडवून बाळाचा केला खून

मुलगी हवी म्हणून आईने केला मुलाचा खून

Published On: Jun 26 2018 7:33AM | Last Updated: Jun 26 2018 11:25AMपानरांजणगाव/पैठण: प्रतिनीधी

रात्री झोपताना सोबत असलेला दहा महिन्यांचा चिमुकला मध्यरात्री गायब झाला. पोलिसांसह नातेवाईकांनी रात्रभर शोधमोहीम राबविली, पण तो काही सापडला नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी घरातीलच पाण्याच्या ड्रममध्ये चिमुकल्याचा मृतदेह आढळला. ही हृदयद्रावक घटना पैठणखेडा (ता. पैठण) येथे शनिवारी (दि. 23) रात्री घडली. मुलगी हवी असताना मुलगाच झाल्याने हा खून आईनेच केल्याचे समोर आले आहे.

प्रेम परमेश्‍वर एरंडे (10 महिने) असे मृत चिमुकल्याचे तर वेदिका परमेश्‍वर एरंडे असे त्याच्या खुनी आईचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठणखेडा येथील लिंबादास खैरे यांची मुलगी वेदिका हिचा विवाह गंगापूर तालुक्यातील पिंपरखेडा येथील परमेश्‍वर एरंडे यांच्याशी झालेला आहे. परमेश्‍वर हे चितेगाव येथे कंपनीत कामाला असल्याने ते चितेगावातच राहतात. दरम्यान, वेदिका ही दहा महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन पैठणखेडा येथे माहेरी गेली. शनिवारी रात्री जेवण करून ते झोपी गेले. त्यावेळी प्रेम आईशेजारी झोपला. मध्यरात्री कुटुंबीयांना जाग आली. तेव्हा प्रेम जागेवर नव्हता. शोध घेतला तरी प्रेम मिळून आला नाही. त्यानंतर हा प्रकार तत्काळ बिडकीन पोलिसांना कळविला. पोलिसांनी नातेवाईकांना सोबत घेऊन सकाळपर्यंत परिसरात प्रेमचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. आधीच मुले पळविणार्‍या टोळीची अफवा, त्यात ही घटना घडल्याने पोलिसही चक्रावले. अधिक तपास करताना सहायक निरीक्षक पंडित सोनवणे यांनी श्‍वानपथकाला पाचारण केले. श्‍वान घरातच घुटमळल्यामुळे पोलिसांचा कुटुंबीयांवरच संशय बळावला. त्यात सर्वत्र शोध मोहीम सुरू असतानाच घरातील पाण्याच्या मोठ्या ड्रममध्ये प्रेमचा मृतदेह आढळला. 

धक्कादायक खुलासे

या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलगीच व्हावी, असा वेदिकाचा अट्टहास होता, पण मुलगा जन्मला. दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यास मी असमर्थ असल्याचे तिचे म्हणणे होते. संशय बळावल्याने तपास माहेरच्या कुटुंबीयांभोवतीच फिरत होता. चिमुकल्याची आई वेदिका, आजोबा लिंबादास खैरे, तसेच नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांची चौकशी केली असता वेदिकानेच प्रेमचा खून केल्याचे समोर आल्याचे सहायक निरीक्षक पंडित सोनवणे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक विठ्ठल आईटवार, हवालदार तुळशीराम गायकवाड, प्रकाश शिंदे करीत आहेत.