Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Aurangabad › बापाचे बनावट मृत्यूपत्र तयार करून आईची फसवणूक 

बापाचे बनावट मृत्यूपत्र तयार करून आईची फसवणूक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

वडिलांच्या मृत्यूनंतर बनावट कागदपत्रांद्वारे मुलाने मृत्यूपत्र तयार केले. तसेच, आईच्या परस्पर जमीन बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घातली. रेल्वेस्टेशनजवळील सिल्क मिल कॉलनीत हा गंभीर प्रकार समोर आला. यात आईने मुलाविरुद्ध फसवणूक, मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्याद दिली असून 25 नोव्हेंबर रोजी सातारा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

मंजूर खान मसूद खान (55, रा. सिल्क मिल कॉलनी, रेल्वे स्टेशनजवळ) असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बीएमसी बँकेचा संचालक आहे. खाजा बेगम मसूद खान असे फिर्यादी आईचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खाजा बेगम यांना पाच मुले, तीन मुली अशी अपत्ये आहेत. 2001 मध्ये खाजा बेगम यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर वारसाहक्काने त्यांची इटखेडा येथील जमीन तसेच अन्य संपत्ती खाजा बेगम यांच्यासह मुला, मुलींच्या अधिकारात आली; परंतु मोठा मुलगा मंजूर खान याने आई खाजा बेगम तसेच इतर भाऊ, बहिणींना बाजूला करून वडिलांच्या नावाने बनावट मृत्यूपत्र तयार केले.

त्यावर खाजा बेगम यांच्या खोट्या सह्या केल्या. 2004 मध्ये इटखेडा येथील शेतजमीन विकसित करण्यासाठी भागीदारीपत्रक तयार करून बांधकाम व्यावसायिकाकडे हस्तांतरण केले. 2010 पर्यंत मंजूर खान याचा हा प्रकार सुरूच होता. मुलाने फसविल्याची बाब 2010 मध्ये खाजा बेगम यांना समजली. त्यानंतर मंजूर खान याने आईला 3 कोटी रुपये देण्याचे कबूल केले. तसे दस्ताऐवजही तयार केले, परंतु अद्यापपर्यंत मंजूर खान याने आई खाजा बेगम यांना पैसे दिले नाहीत. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर खाजा बेगम यांनी सातारा ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात मंजूर खान याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक खरात करीत आहेत.