Sat, Jul 20, 2019 10:44होमपेज › Aurangabad › ‘राज्यात साडेतीन हजार पोलिस वसाहतींचे बांधकाम’

‘राज्यात साडेतीन हजार पोलिस वसाहतींचे बांधकाम’

Published On: Jan 16 2018 11:03AM | Last Updated: Jan 16 2018 11:03AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

राज्यात साडेतीन हजार पोलिस वसाहतींचे बांधकाम सुरू असल्याची माहिती पोलिस गृहनिर्माण व कल्याण विभागाचे महासंचालक विष्णूदेव मिश्रा यांनी काल (सोमवारी १५ जानेवारी) दिली. पोलिस आयुक्‍तलय आणि वसाहतींच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या मिश्रा यांनी मोजक्या पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तसेच मार्च २०१८पर्यंत पोलिस आयुक्‍तालयाची इमारत पूर्ण होईल. पुढील सहा ते आठ महिन्यांत क्रांती चौक व सिडको येथील पोलिस वसाहतींचे काम सुरू करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलिस आयुक्‍तालय आणि परिसरात सुरू असलेल्या पोलिस वसाहतींच्या बांधकामाची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी विष्णूदेव मिश्रा रविवारी सायंकाळी औरंगाबादेत आले होते. सोमवारी त्यांनी आयुक्‍तालयाची इमारत, पोलिस उपायुक्‍त, सहायक आयुक्‍त यांच्या बंगल्याची आणि 537 पोलिस क्वॉर्टर्सची पाहणी केली. मार्चपर्यंत आयुक्‍तालयाची इमारत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम ठेकेदाराला दिल्या आहेत. पोलिसांसाठी नवीन वसाहत तयार करण्यापेक्षा म्हाडाने बांधलेल्या इमारती घेऊन पोलिसांना क्वॉर्टर देण्याचा पोलिस गृहनिर्माण विभागाचा मानस होता. त्यानंतरच पैठण एमआयडीसी आणि तिसगाव (ता. औरंगाबाद) येथे पोलिसांसाठी काही क्वॉर्टर्स घेण्यात आले. परंतु, देवळाईतील म्हाडाची योजना पोलिस विभागाच्या पसंतीस उतरली नाही. पाणी आणि भौतिक सुविधा नसल्यामुळे देवळाईतील क्वॉर्टर्स नाकारण्यात आले, अशी माहिती विष्णूदेव मिश्रा यांनी दिली.  

राज्य शासनाने पोलिसांच्या घरांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच, पूर्वी बांधकाम विभागाकडून पोलिसांसाठी घरे बांधली जायची. परंतु, आता पोलिसांचाच गृहनिर्माण विभाग घरांसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पोलिस वसाहतींचे काम जोरात सुरू असल्याचे विष्णूदेव मिश्रा यांनी सांगितले.