होमपेज › Aurangabad › पावसाळी अधिवेशन बंद पाडू : अशोक चव्‍हाण

पावसाळी अधिवेशन बंद पाडू : अशोक चव्‍हाण

Published On: Jun 21 2018 1:28PM | Last Updated: Jun 21 2018 1:28PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यापासून राज्यात कधी गारपीट, कधी अतिवृष्टी झाली, आता तर पाऊसच नाही. राज्याच्या जनतेसाठी हे सरकार करंट सरकार ठरले आहे. या सरकारचा पायगुण काही चांगला नाही, असा टोला लगावत कर्जमाफी जाहीर केली मात्र मिळाली कुणालाही नाही, आता पीककर्जासाठी शेतकर्‍यांचा छळ सुरू आहे, आगामी पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवून, सभागृहाचे कामकाज  बंद पाडू, असा इशारा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सागर लॉन्सवर जिल्ह्यातील बुथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिला. 

व्यासपीठावर माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, समन्वयक भिमराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार झांबड, माजी आमदार डॉ. काळे, नितीन पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, नगरसेविका सायली जमादार, प्रदेश प्रतिनिधी डॉ. जितेंद्र देहाडे, सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, बाबा तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या चार वर्षात राज्यात १५ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. किड्या-मुंग्याप्रमाणे शेतकरी मरत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, कर्जमाफी मिळाली नाही, पीककर्ज बंद आहे. पीक विम्याची रक्कमही हाती पडली नाही. नीरव मोदी, विजय मल्ल्या पैसे घेऊन पळून गेले, ते चालतात, मात्र आमचा शेतकरी बँकाना चालत नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बँकेसमोर आंदोलने करा, मोर्चे काढा, असे निर्देशही चव्हाण यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिले. 

मुळ मुद्यापासून लक्ष वेगळे करण्यासाठी जळगावातील घटनेच्या प्रकरणात राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. कुणी बोलायचे नाही, बोलले तर नोटीस पाठवणे, गुन्हा नोंदवण्याचे प्रकार केले जात असल्याचे चव्हाण म्हणाले. पाकिस्तानातून केलेल्या साखर आयातीमुळे साखरेचे उतरलेले दर, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बसलेला फटका, योजना ऑनलाईन मात्र सरकार ऑफलाईन, इंधन भाववाढ, एसटीची भाडेवाढ आदी मुद्यावरही चव्हाण यांनी टीका केली. आरएसएस प्रत्येक गावात कॅन्सरप्रमाणे पसरत आहे. राज्यात मनुवादाला खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे. जळगाव प्रकरण, औरंगाबादेतील घटना घडवून जातीयवाद निर्माण करून, भांडणे लावून मतांचे विभाजन करण्याची भाजपची रणनिती असल्याचा आरोप करत मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याच्या मुद्याचाही त्यांनी पुर्नउच्चार केला.

नवरदेव कुणीही असेना...सरकार आपले आले पाहिजे..

आरएसएस, भाजप, शिवसेनेशी आपला मुकाबला आहे, गाव पातळीपर्यंत कार्यकर्ते तयार झाले नाहीत, तर निवडणुका जिंकणे अवघड आहे. बुथ कमिट्या तयार करण्याचे काम गांभिर्याने करा. ज्या गावांत काम चांगले होईल तिथे आपले उमेदवार विजयी होतील. नवरदेव कुणीही असेना, त्याला निवडून आणले तरच आपले सरकार येईल. कुणी काम केले, कुणी बंडल मारली.. सर्व माझ्या लक्षात आले आहे. घरी बसून याद्या तयार करू नका, अशा शब्दांत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे कानही टोचले.

पालकमंत्र्यांनाही शालजोडे..

किड्या-मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहे, सरकार बघायला तयार नाही. पालकमंत्र्यांना यायला वेळ नाही. सुरवातीला पालकमंत्री किमान फोटो काढायला तरी यायचे, असा टोला रामदास कदम यांचे नाव न घेता लगावला. मात्र आता तेही बंद झालेले आहे.