Fri, Jul 19, 2019 20:49होमपेज › Aurangabad › रोमिओंची शेरेबाजी; तरुणीचा विनयभंग

रोमिओंची शेरेबाजी; तरुणीचा विनयभंग

Published On: Jul 09 2018 1:33AM | Last Updated: Jul 09 2018 1:27AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दुचाकीवरून आलेल्या दोन सडकसख्याहरींनी अश्‍लील शेरेबाजी करीत 24 वर्षीय तरुणीची छेड काढली. ही घटना 6 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता सिडको ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दुचाकीवरील रोडरोमिओंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहरात तरुणी, महिलांच्या छेडछाडीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. पोलिसांनी दामिनी, ‘पोलिस दीदी’सारखे विशेष पथक नेमूनही यात फारसा काही फरक पडलेला नाही. शाळा, मंदिरे, पर्यटनस्थळे, बाजारपेठा, मॉल्स आदी गर्दीच्या ठिकाणी तरुणी नेहमी सडकसख्याहरींच्या शिकार ठरतात. भररस्त्यावरही रोडरोमिओंचे टोळके महिला, तरुणींना छेडू लागले आहेत. 6 जुलै रोजी 24 वर्षीय तरुणी रस्त्याने जात होती. त्याचवेळी दुचाकीवरून (क्र. एमएच 20, बीएफ 7962) दोघे पाठीमागून आले. त्यांनी तरुणीला पाहून अश्‍लील शेरेबाजी केली. तरुणीने त्याचा जाब विचारल्यावर ‘तुझे दिखाऊ क्या मैं, कोन हूँ’ अशी धमकी देऊन आरोपींनी रस्त्यातच तिचा हात धरला. तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. तसेच, या प्रकाराविषयी कोणाला सांगितले तर, जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडितेने तत्काळ सिडको ठाण्यात धाव घेतली आणि रोडरोमिओंविरुद्ध तक्रार नोंदविली. या प्रकणाचा तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.