Tue, Jul 23, 2019 02:36होमपेज › Aurangabad › मोबाइल चोरला म्हणून ‘त्या’ पेंटरचा खून

मोबाइल चोरला म्हणून ‘त्या’ पेंटरचा खून

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 12:32AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

सिडको बसस्थानकात झोपलेल्या तरुणाच्या खिशातून मोबाइल चोरल्याच्या संशयावरून पाच जणांनी लाकडी दांड्याने मारहाण करून पेंटर रमेश आनंदराव नरवडे (35, रा. रामनगर, तान्हाजीनगर, एन-2, सिडको) याचा खून केला. हा प्रकार 16 मे रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.

अनिकेत रतन भोळे (18, रा. शहानगर, मसनतपूर) आणि अमर संजय सोनवणे (26, रा. राजीव गांधीनगर, मुकुंदवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने 23 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्या कबुली जबाबावरून तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, रमेश 15 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर पडला. त्या दिवशी तो रात्री घरी परतलाच नाही. 16 मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास तोंडओळख असलेला एक रिक्षाचालक त्याच्या घरी गेला. त्याने सिडको बसस्थानकाच्या कंपाउंडलगत असलेल्या नवनाथ हॉटेलसमोर रमेश नग्‍नावस्थेत पडलेला असल्याचे सांगितले. त्यामुळे आनंदराव नरवडे यांनी तत्काळ तिकडे धाव घेतली. 108 रुग्णवाहिकेला बोलावून त्यांनी रमेशला उपचारासाठी घाटीतील ट्रॉमा केअर विभागात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान 18 मे रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याचे वडील आनंदराव धोंडिराम नरवडे (70) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. 

सीसीटीव्ही फुटेजवरून झाली उकल

ज्या ठिकाणी रमेशचा मृतदेह पडून होता त्या परिसरातील सीसीटीव्ही पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी तपासले. त्यात वरील आरोपी मृत रमेशला दुचाकीवरून घेऊन जाताना स्पष्ट झाले. त्यावरून तपास करून पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.