Mon, Mar 18, 2019 19:20होमपेज › Aurangabad › रेल्वेच्या दारात उभे राहून बोलणे पडले महागात 

रेल्वेच्या दारात उभे राहून बोलणे पडले महागात 

Published On: Jun 01 2018 1:56AM | Last Updated: Jun 01 2018 12:32AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रेल्वेतून  प्रवास करताना  अनेकांना दरवाजात उभे राहून प्रवास करण्याचा मोह आवरत नाही. त्यातल्या त्यात अशा वेळी फोन आल्यास तिथेच उभे राहून बोलणार्‍यांची संख्या जास्त आहे. नेमके याच मोहापाई अनेकांना आपला किमती मोबाइल गमावण्याची वेळ येत आहे. तीन महिन्यांत चोरट्यांनी अशा पद्धतीने प्रवाशांचे 108 मोबाइल पळवले आहेत, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळाली. 

रेल्वेत जागा असतानाही दारात बसून प्रवास करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नेमके याच संधीच्या शोधात असलेल्या चोरट्यांनी आपला हात साफ करण्याची मोहीम गती वाढवली आहे. दारात बसलेला प्रवासी गाफील असतो. नेमके हेच हेरून चोरटे यांना टार्गेट करत आहेत. रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार आवाहन करूनही प्रवासी ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे चोरट्यांचे फावत आहे.

मोबाइल चोरीच्या अजब तर्‍हेमुळे प्रवासीही हैराण आहेत, परंतु दारात उभे राहून मोबाईलवर बोलण्याचा मोह मात्र सोडत नसल्याने मोबाइल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च दरम्यान रेल्वेत 188 चोर्‍या झाल्या आहेत. यापैकी 108 चोर्‍या ह्या मोबाइलच्या झाल्या आहेत. या चोर्‍या हातावर काठी मारून मोबाइल खाली पाडणे व तो पळवणे अशा प्रकारेच झाल्याचे समोर आले . 

या ठिकाणी होतात असे प्रकार 

धावत्या रेल्वेत दारात उभे राहून मोबाइलवर बोलणार्‍या प्रवाशांच्या हातावर काठी मारून तो मोबाइल खाली पाडण्याचे प्रकार ज्या ठिकाणी गाडी सावकाश धावते अशा ठिकाणीच होत आहेत. यात राजीव नगर, एकनाथनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा आदी भागात हे प्रकार वाढले आहेत. प्रवाशांना अशा वेळी एक तर पुढच्या स्टेशनवर तक्रार करावी लागते किंवा शेवटच्या स्टेशनवर तक्रार करावी लागते. यामुळे अनेक प्रवासी या बाबत तक्रारच करत नाहीत. त्यामुळे अशा चोरट्यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले आहे.