Sat, Jul 20, 2019 08:52होमपेज › Aurangabad › स्थापत्य अभियांत्रिकीच्या परीक्षेत घोळ

स्थापत्य अभियांत्रिकीच्या परीक्षेत घोळ

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:31AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत गुरुवारी (दि. 24) घोळ झाला. सर्वेयिंग-2 या विषयाच्या ओल्ड (जुन्या) अभ्यासक्रमाच्या प्रश्‍नपत्रिकेतील ब विभागात नवीन अभ्यासक्रमातील प्रश्‍न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाने ब विभागाची प्रश्‍नपत्रिका बदलून पाठविली. मात्र, यात बराच वेळ वाया गेला असताना परीक्षेची वेळ वाढवून न मिळल्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. जुन्या अभ्यासक्रमाच्या किमान 700 ते 800 विद्यार्थ्यांबाबत हा प्रकार घडला. एकट्या पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर शंभर परीक्षार्थी होते. 

विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या सध्या परीक्षा सुरू आहेत. आज स्थापत्य अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा सर्वेयिंग -2 हा पेपर होता. सकाळी दहा ते दुपारी एक ही परीक्षेची वेळ होती. प्रश्‍नपत्रिकेत अ आणि ब असे दोन विभाग असतात. सर्वेयिंग -2 च्या अ विभागात जुन्या अभ्यासक्रमाचे प्रश्‍न होते. मात्र, ब विभागात नव्या अभ्यासक्रमांचे प्रश्‍न होते. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. हे प्रश्‍न कसे सोडवावेत, असा प्रश्‍न त्यांना पडला. प्रश्‍नपत्रिकेतील ही चूक लक्षात येईपर्यंत सव्वा तास उलटला होता. विद्यापीठाला ही बाब कळविण्यात आल्यानंतर प्रशासन हलले. ब विभागाची सुधारित प्रश्‍नपत्रिका लवकरच पाठविण्यात येईल, असा संदेश विद्यापीठाने 11 वाजून 50 मिनिटांनी परीक्षा केंद्रांना पाठवला.

त्यानंतर प्रश्‍नपत्रिका यायला आणि प्रिंट काढून तिचे परीक्षार्थींना वितरण करेपर्यंत दोन तास उलटले होते. परीक्षा केंद्रातील अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून द्यायचा का, अशी विचारणा केली. मात्र, आपण वेळेत विद्यार्थ्यांना सुधारित उत्तरपत्रिका दिलेली आहे. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची गरज नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ वाढवून मिळाली नाही. दरम्यान, सुधारित प्रश्‍नपत्रिकेतही नवीन अभ्यासक्रमातील प्रश्‍न होते, अशी काही विद्यार्थ्यांची तक्रार होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.