Fri, Jan 18, 2019 21:13होमपेज › Aurangabad › ‘यहा मिस कॉल पे मिलती है दारू‘

‘यहा मिस कॉल पे मिलती है दारू‘

Published On: Dec 15 2017 10:24AM | Last Updated: Dec 15 2017 10:28AM

बुकमार्क करा

लासूर स्टेशन : संदीप गायकवाड

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील परमीट रुम, बिअरबार, देशी  दारू, बिअर शॉपीची दुकाने बंद झाली. असे असले तरी लासूर स्टेशन बाजारपेठेत मात्र नवीन-नवीन युक्त्या व शक्‍कल लढवून हॉटेल, ढाब्यांवर छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे.

मिस कॉल द्या आणि दारू घरपोच मिळवा, असा प्रकार सध्या परिसरात पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावात अवैध पद्धतीने दारू विक्रीचा काळा धंदा राजरोसपणे सुरू आहे. हॉटेल, धाब्यावर एका फोनवर घरोपच दारू मिळत आहे. यावरून दारू बंदीचा फटका तळीरामांना बसलाच नसल्याचे समोर आले आहे,तसेच छुप्या पद्धतीने हॉटेल- धाब्यांवर अव्वाच्या सव्वा दराने दारू विकली जात आहे. उलट दारू बंदीमुळे अवैधरित्या दारू विक्री करणार्‍यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. 

‘साध्या गल्‍ली बोळात अवैध दारू विक्री सुरू असून शासनाची ग्रामीण भागात दारू बंदी फक्‍त नावालाच उरली आहे. त्यामुळे महसूल तसेच पोलिस प्रशासनाने या अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करणे आवश्यक बनले आहे’ असे उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी सांगितले.

‘अवैध दारू विक्री व्यवसाय सद्या जोमात सुरू आहे. कायद्यात दारू विक्रेत्यावर कडक शिक्षेची तरतूद नाही. यामुळे कारवाईचा फार  काही रक पडत नाही. त्यामुळे शासनाने अवैध दारू विके्रत्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करावी असे  युवासेना उपशहरप्रमुख अमोल शिरसाठ यांनी सांगितले.