Tue, Jul 16, 2019 13:39होमपेज › Aurangabad ›  मिनी घाटीत उद्घाटनाआधीच लाचखोरीचा शुभारंभ!

 मिनी घाटीत उद्घाटनाआधीच लाचखोरीचा शुभारंभ!

Published On: Jul 10 2018 1:33AM | Last Updated: Jul 10 2018 1:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

अनेकदा तारीख ठरवूनही आतापर्यंत चिकलठाणा येथील मिनी घाटीचे अधिकृत उद्घाटन झालेले नाही. प्रत्यक्ष आरोग्य सेवेला जरी शुभारंभ झालेला नसला तरी येथे लाचखोरीचा मात्र धडाक्यात शुभारंभ झाला. पैठणच्या डॉक्टर दाम्पत्याकडून रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या मिनी घाटीतील सांख्यिकी सहायकाला एसीबीने सोमवारी रंगेहाथ पकडले. संतोष रामचंद्र जेऊरकर (52, रा. घर क्र. 48, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, नागेश्‍वरवाडी) असे सांख्यिकी सहायकाचे नाव आहे. 

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठणमधील डॉ. मदनलाल चुन्नीलाल मानधने हे भाजपचे माजी तालुकाप्रमुख आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री मानधने यांच्या नावे मानधने रुग्णालय आहे. मुंबई नर्सिंग कायद्यानुसार प्रत्येक तीन वर्षांनंतर या रुग्णालयाच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी डॉ. मानधने यांनी बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयामार्फत चिकलठाणा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा (मिनी घाटी) सांख्यिकी सहायक संतोष जेऊरकर याने डॉ. मानधने यांच्याशी दहा दिवसांपूर्वी मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा त्याने रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे प्रमाणपत्र तयार झाले असून, त्यासाठी शासकीय फीस तीनशे रुपये व आपल्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगितले. 

त्यावेळी डॉ. मानधने यांनी फोन ठेवला पण, त्यानंतर चार दिवसांपूर्वी डॉ. मानधने यांनी जेऊरकरच्या मोबाईलवर संपर्क साधत प्रमाणपत्र तयार झाले का? अशी विचारणा केली. त्यावर जेऊरकरने 9 जुलै रोजी पाच हजार रुपये आणून द्या व प्रमाणपत्र घेऊन जा, असे सांगितले. मात्र, डॉ. मानधने यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यावरून लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. 

त्यात सोमवारी तडजोडीअंती तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे एसीबीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी जेऊरकरला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खोली क्रमांक 53 मध्ये सापळा रचला. तेथे संतोष जेऊरकर याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, नितीन देशमुख, निरीक्षक अनिता वराडे, जमादार गणेश पंडुरे, पोलिस नाईक विजय बाम्हंदे, रवी देशमुख, मिलिंद ईप्पर, हरीष कुर्‍हे, संदीप चिंचोले यांनी केली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.