Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › मिनी फुटबॉल स्टेडियमचा प्रस्ताव धूळखात

मिनी फुटबॉल स्टेडियमचा प्रस्ताव धूळखात

Published On: Feb 14 2018 2:50AM | Last Updated: Feb 14 2018 2:14AMऔरंगाबाद : सतीश अन्वेकर

ऐतिहासिक शहरातील क्रीडा संस्कृती उंचावण्यासाठी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात दशकापूर्वी मंजूर झालेले शिवाजी मैदान (आमखास) च्या मिनी फुटबॉल स्टेडियमचे स्वप्न अद्यापही धूळखात पडले आहे. तत्कालीन क्रीडामंत्र्यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत या मैदानाच्या नवीन स्वरूपासाठी भूमिपूजन उरकण्यात आले होतेे. यानंतर तेथील कोनशिलाही गायब झाली. एकूण 1 कोटी 50 लाख रुपये या महत्त्वाकांक्षी कामासाठी मंजूर करण्यात आले होते. परंतु दहा वर्षे उलटली तरी शासनाने ना कोणत्या हालचाली सुरू केल्या, ना क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने गांभीर्य दाखविले. निजामकालीन 150 वर्षे जुने असलेले हे मैदान मराठवाड्यातील फुटबॉलची राजधानी मानले जाते, स्थानिक खेळाडूंसह केनिया, इराक, इराण येथील विद्यार्थी खेळाडू आमखासवर सराव करतात.

नुसते स्वप्न दाखविले
मिनी स्टेडियमची येथे आवश्यकता आहे, आम्ही मनापासून खेळाडू घडवितो, शासन मैदानासाठी काहीच करत नाही. अनेक खेळाडू येथून घडले असून सराव करताना खेळपट्टी प्रचंड खराब असल्याने फुटबॉलप्र्रेमी जखमी होतात, आमखास हा हेरिटेज वारसा असून अतिक्रमणे व सर्व अडथळे दूर करून काम सुरू करावे.

- मोहंमद रियाज सिद्दीकी  का आहे खास... आमखास
आमखास मैदान निजामांनी खाम नदीच्या काठी तयार केले होते. जवळपास साठ वर्षांपासून महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींच्या सभेसाठी या विस्तीर्ण पटांगणाचा वापर केला जातो. सकाळी सहा ते रात्री सातवाजेपर्यंत फुटबॉलचे दर्दी सराव करतात. मात्र मिनी स्टेडियम साकारू शकले नसल्याने फुटबॉलच्या विकासालाच खीळ बसत आहे. आमखासवर सिटी क्लब, वक्फ बोर्ड, शासकीय रुग्णालय व सालारजंग अशा चार-चार स्वरूपात दावे सांगण्यात आले असल्याने खेळाचा खंडोबा होत आहे. मैदानाच्या चारही बाजूंना अतिक्रमणाने वेढले आहे. रसवंती, पानटपरीसह बिनबोभाटपणे जागेचा फुकट वापर केला जात आहे. रात्रीच काय दिवसाही दारूडे हातात बाटल्या घेऊन ठाण मांडून बसतात, गांजा पिणारेही येथे धिंगाणा घालतात. आधी येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय भाडेतत्त्वावर चालू होते, त्याच्या स्थलांतरणानंतर मैदानाची थोडीफार देखभालही बंद पडली आहे.