Tue, Jul 16, 2019 13:35होमपेज › Aurangabad › कारागृहातच शिजला मेहंदी-सरुफखानचा कट : तपासात मोठा खुलासा

मै तुझे जमानत पे छुडाता, तू मुझे छुडा

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 30 2018 12:48AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

पिस्टलच्या गुन्ह्यात हर्सूल कारागृहात गेल्यावर सरुफखान शकूरखानची सुपारी किलर इम्रान मेहंदीसोबत ओळख झाली. सरुफखान हा मध्य प्रदेशातील असल्याने त्याचा जामीन घेण्यासाठी स्थानिकचे कोणीही तयार होत नव्हते. मेहंदीने त्याला शब्द देत, ‘मै तेरी जमानत के लिए आदमी भेजता हूं. बाहर जाने के बाद तू मुझे छुडाना’ असे सांगितले होते. त्यांच्यात हर्सूल कारागृहातच हा कट शिजला होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

इम्रान मेहंदीचा साथीदार हबीब खालेद हबीब मोहंमद ऊर्फ खालेद चाऊस आणि मोहंमद शोएब मोहंमद सादेक हे कट रचून पोलिस संरक्षणातून त्याला पळवून नेणार आहेत, अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी नारेगाव चौकात सोमवारी नऊ जणांना पकडले. त्यानंतर आणखी दोघांना ताब्यात घेत 11 आरोपींना अटक केली. यात मध्य प्रदेशातील सात शार्प शूटरचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल, 8 काडतुसे, दोन कार आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. सध्या हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून, सरुफखान शकूरखान याला 2016 मध्ये उपनिरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने पिस्तुलासह अटक केली होती. त्याच्यावर सातारा ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर हर्सूल कारागृहात होता. तेथे त्याची मेहंदीसोबत ओळख झाली. त्यावेळी सरुफखानचा जामीन घेण्यासाठी स्थानिकचे कोणीही नव्हते. त्यामुळे मेहंदीने त्याला जामीन मिळवून देतो. माझी माणसे तुझा जामीन घेतील. पण, सुटल्यावर तू माझ्या सुटकेसाठी पोलिसांवर हल्ला करायचा. मला त्यांच्या ताब्यातून पळवून घेऊन जायचे, असा कट तेव्हाच शिजला होता. त्यानंतरच सरुफखानला चार महिन्यांपूर्वी जामीन मिळाला होता. कारागृहातून सुटल्यावर सरुफखाननेच मध्य प्रदेशातून ही गँग औरंगाबादेत आणली होती. 

न्यायालयात करणार होते हल्ला

माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या हत्याप्रकरणात शिक्षेच्या सुनावणीसाठी इम्रान मेहंदीला न्यायालयात आणण्यात येणार होते. त्यामुळे न्यायालयात पिस्तुलातून फायरिंग करून गोंधळ निर्माण करायचा आणि त्याचा फायदा घेऊन पळून जायचे, असा कट या टोळीने आखला होता. जर, जास्तीचा गोळीबार करण्याची गरज पडली तर आठ काडतुसे त्यांच्याकडे होती. तत्पूर्वीच गुन्हे शाखेने त्यांचा कट उधळून लावला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

शार्प शूटर टोळीची एटीएसकडून चौकशी

सुपारी किलर इम्रान मेहंदीला पोलिसांच्या ताब्यातून पळविण्यासाठी मध्य प्रदेशातून औरंगाबादेत आलेल्या सात जणांच्या टोळीची बुधवारी एटीएसकडून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही. तसेच, या टोळीने फकीरवाडी भागात फायरिंगचा सराव केल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेने रात्री उशिरापर्यंत त्या भागात झाडाझडती घेतली. यादरम्यान, चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले होते. मध्य प्रदेशातील सात शार्प शूटर शहरात होते, हे एटीएसला समजल्यावर बुधवारी त्यांनी पोलिस कोठडीतील या आरोपींची चौकशी केली. दरम्यान, या शार्प शूटरने हर्सूल भागातील फकीरवाडीत फायरिंगचा सराव केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून तेथे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरूच होती. यात चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याशिवाय, या टोळीचा प्लॅन ‘बी’ काय होता? याचाही शोध पोलिस घेत असून त्यानुसार, आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.