Mon, Apr 22, 2019 12:08होमपेज › Aurangabad › घरात एक खासदार, दोन नगरसेवक तरी पाणी नाही!

घरात एक खासदार, दोन नगरसेवक तरी पाणी नाही!

Published On: Apr 28 2018 1:52AM | Last Updated: Apr 28 2018 1:52AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मागील अनेक दिवसांपासून शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याचे पडसाद शुक्रवारी (दि.27) स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे काही भागात दोन-तीन, तर काही ठिकाणी चौथ्या दिवशी पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत सभागृह दणाणून सोडले. तर घरात एक खासदार व दोन नगरसेवक असतानाही आठव्या दिवशी पाणी येत असल्याने आम्हाला घराच्यांचे टोमणे ऐकावे लागत आहेत, असा उद्विग्न सवालही खा. खैरे यांचे चिरंजीव तथा नगरसेवक ऋषीकेश खैरे यांनी सभागृहात केला. यावर सभापती गजानन बारवाल यांनी, प्रशासनाने याची गंभीर दखल घेत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे आदेश दिले.

कचराकोंडीनंतर आता शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे शहरवासीयांच्या घशाला कोरड पडली असून विकतच्या टँकरवर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे शुक्रवारी स्थायी समितीची बैठक सुरू होताच नगरसेवकांंनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. हडको-सिडको भागावर पाणी वाटपात अन्याय केला जात असून सावत्र वागणूक दिली जात असल्याचा आरोप नगरसेवक राज वानखेडे, सीताराम सुरे, स्वाती नागरे यांनी केला. सभागृहाने यापूर्वीही समान पाणी वाटपाचे आदेश देऊनही काहीच झाले नाही. सभागृहात शब्दाला किंमत नसल्याने नगरसेवक, स्थायी सदस्य होऊन काय फायदा, असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित केला. नगरसेवक राजू वैद्य यांनी आपल्या वॉर्डात तीन ते चार दिवसांनंतर पाणी सोडले जाते. त्यात ठराविक वेळ नाही. कधीही पाणी सोडले जाते. 

दोन ते तीन टप्प्यांसाठी संपूर्ण शहरच तहानलेले ठेवले जात असल्याची तक्रार केली. नगरसेविका राखी देसरडा, संगीता वाघुले, मनीषा मुंढे यांनीही आपल्या भागात अनियमित पाणीपुरवठा होतो. काही भागात तीन तर काही भागात चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पाणी सोडले जात असल्याची तक्रार केली. तसेच जुन्या शहरात तब्बल आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

यावर सभापती बारवाल यांनी पुढच्या बैठकीत सविस्तर माहिती सादर करावी आणि चार दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे आदेश दिले. मनपाच्या प्रभारी आयुक्‍तपदाचा पदभार असताना तत्कालीन जिल्हाधिकारी एन. के. राम यांनी शहरातील सर्व भागात समान पाणी वाटप करावे, असे आदेश दिले होते. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनीही मनपा प्रशासनाला शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे आदेशित केले होते. मात्र, महापौर आणि आयुक्‍तांच्या आदेशाची कुठलीही दखल पाणीपुरवठा विभागाने घेतली नसल्याचे दिसत आहे. अद्यापही शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत असून शहवासीयांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.