Wed, Aug 21, 2019 19:04होमपेज › Aurangabad › ‘नालायक’पणाची टीका भोवली

‘नालायक’पणाची टीका भोवली

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 1:22AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लोकप्रतिनिधींना ‘नालायक’ ठरविणारी पोस्ट फेसबुकवर टाकणे  सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांना महागात पडले. सर्वसाधारण सभेत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी खरवडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर महापौरांनी खरवडकर यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.

खरवडकर यांनी 12 फेब्रुवारी रोजी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे मनपातील वातावरण आधीपासूनच तापलेले होते. ‘नालायक लोकांना सभागृह मिळाल्यानंतर ते तत्त्वज्ञानी बनून बेछूट आरोप करतात, यालाच लोकशाही म्हणतात’ असा मजकूर या पोस्टमध्ये होता. मनपाच्या मागील काही सभांमध्ये अतिक्रमण आणि इतर काही मुद्यांवरून खरवडकर हे नगरसेवकांकडून लक्ष्य बनले होते. या पार्श्‍वभूमीवर खरवडकर यांची ही पोस्ट नगरसेवकांना चांगलीच झोंबली. त्याचवेळी सेना-भाजपच्या काही नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

आयुक्तांनीही लगेचच खरवडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे अधिकार गोठविले होते. दरम्यान, बुधवारी खरवडकर यांनी ही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्यात संसदेत झालेल्या वादासंदर्भाने केली होती, असा खुलासा केला होता. त्यांच्या खुलाशानंतर काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक झाले. त्याचे पडसाद गुरुवारी सभेत उमटले. राज वानखेडे, त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ, अफसर खान, सोहेल शेख, भाऊसाहेब जगताप, विकास जैन, सुनीता आऊलवार आदींनी हा संपूर्ण नगरसेवकांचा अपमान आहे, खुलाशात त्यांनी संसदेचाही अवमान केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. एमआयएमचे गंगाधर ढगे यांनी दमडीमहल येथे अतिक्रमणांवर कारवाई केल्याने खरवडकर यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला. एमआयएमचे आयुब जागीरदार यांनी अधिकार्‍याने जाणीवपूर्वक चूक केली असेल तर कारवाई करावी, मात्र त्यांना टार्गेट केले जात आहे, असे मत मांडले. याच दरम्यान काही महिला नगरसेविकांनी खरवडकरांचे करायचे काय? अशा घोषणा सभागृहात दिल्या. तासाभराच्या चर्चेनंतर महापौरांनी खरवडकरांवर शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.