Wed, May 22, 2019 15:17होमपेज › Aurangabad › दमडी महलच्या रस्त्यावरून महापौर-विरोधी पक्ष नेत्यांत खडाजंगी

दमडी महलच्या रस्त्यावरून महापौर-विरोधी पक्ष नेत्यांत खडाजंगी

Published On: Dec 19 2017 1:18AM | Last Updated: Dec 19 2017 12:38AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

चंपाचौक ते दमडी महल रस्त्यावरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून सोमवारी सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले आणि विरोधी पक्ष नेता फेरोज खान यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. महापौरांनी विरोधी पक्ष नेत्यांना उद्देशून, तुम्ही खाली बसा, नसता मला कारवाई करावी लागेल, असे सुनावले. त्यामुळे खान यांच्यासह एमआयएमचे इतर नगरसेवकही खवळले. त्यांनी आक्रमक होत महापौरांसमोरील डायसकडे धाव घेतली. यादरम्यान फेरोज खान आणि महापौर या दोघांनाही एकमेकांना खडे बोल सुनावले. 

विकास आराखड्यात जालना रोडपासून चंपा चौकमार्गे विभागीय आयुक्‍तांच्या बंगल्यासमोर दमडी महलपर्यंत शंभर फुटांचा रस्ता आहे. पालिकेने त्यासाठी दमडी महल येथे नाल्यावर मोठा पूलही बांधला; परंतु एका बांधकामाच्या अडथळ्यामुळे हा रस्ता रखडला आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनी सभेत अधिक आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित केला. हे अतिक्रमण पवार नावाच्या व्यक्‍तीचे असून ते वाचविण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक राजकारण करीत असल्याचा आरोपही खान यांनी केला. याचवेळी महापौरांच्या आदेशावरून विधी अधिकारी अपर्णा थेटे यांनी त्या जागेच्या पीआर कार्डवर महसूल विभागाचे नाव आहे, ती पवार यांच्या मालकीची नाही, सध्या हे प्रकरण अतिक्रमण विभागाकडे प्रलंबित आहे, असा खुलासा केला.

आयुक्‍तांनी ते अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले आहेत, तरीही ते पाडले जात नाही, महापौरांनी आताच ते अतिक्रमण पाडण्याचे आदेश अधिकार्‍यांना द्यावेत, अशी मागणीही खान यांनी केली. महापौरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून खान यांचा आवाज वाढला. त्यामुळे महापौरही संतापले. त्यांनी खान यांना तुम्ही मोठ्या आवाजात बोलू नका, खाली बसा असे सुनावले. यानंतर एमआयएमचे विकास एडके, गंगाधर ढगे, ए. टी. के. शेख, अब्दुल अजिम, नासेर सिद्दीकी आदी नगरसेवकही पुढे सरसावले. खान यांनी मीही नगरसेवक आहे, असे म्हणत खाली बसण्यास नकार दिला. यावेळी बराच वेळ महापौर आणि खान यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. युतीच्या नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले. शेवटी मनपा आयुक्‍तांनी या प्रकरणात माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. 

प्रमोद राठोड, फेरोज यांच्यातही तू तू मै मै

महापौरपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असे म्हणत प्रमोद राठोड यांनी महापौरांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर फेरोज खान यांनी मैं तुझसे बात नहीं कर रहा, म्हणत राठोड यांना फटकारले. त्यानंतर या दोघांतही बाचाबाची झाली. 

अतिक्रमणचे अधिकारी गैरहजर

अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरू असताना या विभागाचा एकही अधिकारी सभागृहात हजर नव्हता. महापौरांनी विचारणा करूनही त्यांना हे अधिकारी कुठे गेले याचे योग्य उत्तर मिळाले नाही. सभा संपेपर्यंत अतिक्रमण विभागाचा कोणताच अधिकारी सभागृहात फिरकला नाही.