Thu, Jun 27, 2019 10:19होमपेज › Aurangabad › आयुक्‍त कार्यालयावरमातंग क्रांती मोर्चाचा एल्गार

आयुक्‍त कार्यालयावरमातंग क्रांती मोर्चाचा एल्गार

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महाराष्ट्रात मातंग समाजावरील अन्याय, अत्याचार थांबवा, वाकुडी येथील मातंग तरुणांची नग्‍न धिंड काढणार्‍यांवर मोक्‍कांतर्गत कारवाई करून, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करावे. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी येथे मातंग दाम्पत्य मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांना मारहाण करून गावातील मातंगांवर बहिष्कार टाकणार्‍या गावकर्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे नोंदवा अशा विविध मागण्या करीत मातंग क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली मातंग समाजाने विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढला.

सकाळी 8 वाजेपासूनच मराठवाड्यासह विविध भागांतून मोर्चेकरी क्रांती चौकात जमा होण्यास सुरुवात झाली होती. पिवळे व निळे झेंडे घेऊन तरुण मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. दुपारी साडेबारा वाजेदरम्यान मोर्चाला सुरुवात झाली. शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत मातंग क्रांती मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे विभागीय आयुक्‍त कार्यालयावर गेला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. विविध मान्यवरांनी विचार व्यक्‍त केले. यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्‍तांना निवेदन दिले. यावेळी संजय ठोकळ, सुभाष वाघुले, सुनील नाडे, राजू अहिरे, रमेश चांदणे, कमलेश चांदणे, बबन दाभाडे, सुनील अहिरे, भाऊसाहेब काळुंके, प्रा. संजय सांभाळकर, महेंद्र तुपे, अंबादास हिवाळे, रवी चांदणे, संदीप चांदणे, सूरज पाखरे, संदीप वाघमारे, डॉ. शेषराव नाडे आदींचा समावेश होता.

मोर्चेकर्‍यांच्या मागण्या

जामनेर तालुक्यातील वाकुडी येथील मातंग मुलांना मारहाण करणार्‍यांवर मोक्‍कांतर्गत कारवाई करावी. पीडित कुटुंबीयांना शासनाने दहा लाख रुपये मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे. भीमा-कोरेगाव दंगलीतील आरोपी संभाजी भिडेला तत्काळ अटक करावी. उदगीर रुद्रवाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले म्हणून मातंग दाम्पत्याला मारहाण करून गावातील मातंग समाजावर बहिष्कार टाकण्यात आला. सदर गावकर्‍यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. क्रांतिगुरू लहुजी साळवे, व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारावे. लहुजी साळवे आयोगाची 68 शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करून जीआर काढावा. बंद असलेले अण्णा भाऊ साठे महामंडळ त्वरित 
सुरू करण्यात यावे. मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणात अ.ब. क. ड. गट करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.