Thu, Apr 25, 2019 14:15होमपेज › Aurangabad › धर्मांतर करून अल्पवयीन मुलीचा विवाह

धर्मांतर करून अल्पवयीन मुलीचा विवाह

Published On: Feb 09 2018 2:17AM | Last Updated: Feb 09 2018 2:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिचे धर्मांतर केले. नंतर तिच्यासोबत विवाह करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या आरोपीला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला गुरुवारी (8 फेब्रुवारी) कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.

या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, 20 जानेवारी 2018 रोजी फिर्यादीची बहीण ही दुपारी दोनला शिवण क्लासला जाते म्हणून सांगून गेली व तिची आई तिला घेण्यासाठी रात्री आठला गेली असता ती तिथे नव्हती. ती त्या दिवशी शिवण क्लासला आलीच नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली व हरवल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली. संशय आल्यानंतर दुसर्‍या दिवशी अपहरणाची तक्रार देण्यात आली. दरम्यान, संबंधित मुलगी ही काशीमीरा (जि. ठाणे) येथे आरोपी उस्मान खान दाऊद खान (23, रा. चिश्तिया कॉलनी, एन-चार, औरंगाबाद) याच्यासोबत आढळून आली. आरोपीला 6 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. 

टीसीवर सज्ञान; जन्मदाखल्यावर अल्पवयीन!
त्यावेळी मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारून आरोपीशी लग्न केल्याचा जबाब दिला व महाविद्यालयाची ‘टीसी’ दाखविली, ज्यात ती सज्ञान असल्याचे दिसून आले. मात्र पालिकेकडून संबंधित मुलीचा जन्मदाखला मागवण्यात आला असता, त्यानुसार मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी आरोपीला बुधवारी (7 फेब्रुवारी) अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे, तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिचे धर्मांतर करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असून, त्याबाबत तपास करणे बाकी आहे, त्याचवेळी आरोपीचे कोणी साथीदार आहेत का व आरोपीने पीडितेला कुठे-कुठे नेले याबाबत सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.