Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Aurangabad › मराठवाड्याला मिळणार पावणेतीनशे कोटींचा निधी

मराठवाड्याला मिळणार पावणेतीनशे कोटींचा निधी

Published On: Feb 07 2018 1:33AM | Last Updated: Feb 07 2018 1:20AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कर्जमाफीच्या निर्णयानंतर खर्च कपातीचे धोरण स्वीकारत शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीतील 30 टक्के निधी कपात करण्याचे आदेश काढले होते. हे आदेश काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठवाड्याला कपात झालेला 279 कोटींचा निधी मिळणार आहे. 

सन 2017-18 या वर्षासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा जिल्हा वार्षिक योजनांसाठी (डीपीसी) 1469 कोटी 8 लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यांचा 30 टक्के निधी कपात करण्यात आला होता व हा निधी कपात केल्यानंतर उर्वरित निधी खर्चाची परवानगी दिली होती. काही दिवसांपूर्वीच शासनाने 30 टक्के निधी कपातीचा निर्णय रद्द केला आहे. 
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय रद्द केल्याचे सांगितले. कपात केलेला हा निधी मार्चपूर्वी त्या त्या जिल्ह्यांना मिळेल का, असे त्यांना विचारले असता, हा निधी खर्च करण्यास मार्चपर्यंतची बंधने नसतात. त्यामुळे हा निधी अखर्चित राहिला तरी तो लॅप्स होत नाही. पुढील वर्षीही तो खर्च करता येतो, असे स्पष्ट केले. त्यामुळे हा निधी मार्चनंतरच मराठवाड्याला मिळेल, असे दिसून येत आहे.