Mon, Apr 22, 2019 23:55होमपेज › Aurangabad › मराठवाड्यात विद्यार्थिनीसह दोघांची आत्महत्या; आणखी दोघांचा प्रयत्न

मराठवाड्यात विद्यार्थिनीसह दोघांची आत्महत्या; आणखी दोघांचा प्रयत्न

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 02 2018 11:53PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण नाही, त्यामुळेच आपल्याला नोकरी मिळत नाही, अशी भावना निर्माण झालेल्या उमेश एंडाईत (21, रा. चौधरी कॉलनी) या बेरोजगार मराठा तरुणाने गुरुवारी चिखलठाणा परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

कळंबमधील विद्यार्थिनीचा मृत्यू

मराठा आरक्षण आणि वडिलांचा कर्जबाजारीपणामुळे 29 जुलै रोजी विषारी औषध प्राशन केलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (19) या विद्यार्थिनीचा उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तृष्णा ही उस्मानाबादच्या व्ही. जे. शिंदे महाविद्यालयात एसवायबीकॉमचे शिक्षण घेत होती. तिचे वडील शेतकरी कुटुंबातील असून, मराठा समाजातील गुणवत्ताधारक असूनही नोकरीची संधी नसल्याने तृष्णाने आत्महत्या केल्याचे नातवाईकांनी सांगितले.

मंठ्यात तरुणाने घेतले विष

मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील ज्ञानेश्‍वर देवीदास खरात (18) याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष घेतल्याची माहिती त्याचे वडील देवीदास खरात यांनी दिली. ज्ञानेश्‍वर याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर जालन्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. 

अमरावतीत आत्मदहनाचा प्रयत्न

अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी संजय महादेवराव कदम (40, वडाळी, अमरावती) या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच हा तरुण हातात रॉकेलची बाटली घेऊन आला.  त्याने तेथे रॉकेल अंगावर ओतून घेतले.