Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Aurangabad › ७९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

७९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीच्या 31 जागांसाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील 20 मतदान केंद्रांवर शुक्रवारी शांततेत मतदान झाले. अधिसभेच्या 24 जागांसाठी 62 तर विद्या परिषदेच्या सात जागांसाठी 17 जण रिंगणात होते. एकूण  93.74 टक्के मतदान झाल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली. अधिसभेच्या प्राचार्य गणात 105 पैकी 102 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. व्यवस्थापन प्रतिनिधी गणात 176 मतदार होते.

यातील केवळ दोन जणांनी मतदान केले नाही. विद्यापीठ शिक्षक गणाच्या 171 मतदारांपैकी 168 तर महाविद्यालयीन शिक्षक गणाच्या 3434 मतदारांपैकी 3219 जणांनी मतदान केले. नव्या विद्यापीठ कायद्यानुसारची ही पहिलीच प्राधिकरण निवडणूक आहे. अधिसभेच्या चार गटांसाठी 29 आणि विद्या परिषदेसाठी आठ अशा एकूण 37 जागा आहेत.

तथापि, महाविद्यालयीन शिक्षक गणाचे सर्वात कमी मतदान (88.03 टक्के) वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर तर पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालय आणि परंडा येथील एसजीआरजी शिंदे महाविद्यालयात सर्वाधिक म्हणजे 100 टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली असता शहरी केंद्रांवर कमी आणि ग्रामीण भागातील केंद्रावर भरभरून मतदान झाल्याचे चित्र दिसते.