Tue, Apr 23, 2019 02:19होमपेज › Aurangabad › मराठ्यांनी केली ‘नाकाबंदी’

मराठ्यांनी केली ‘नाकाबंदी’

Published On: Aug 10 2018 1:25AM | Last Updated: Aug 10 2018 1:25AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी क्रांती दिनी पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील हिंसक प्रकार वगळता औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात खरोखर अभूतपूर्व, ऐतिहासिक आणि क्रांतिकारीच ठरला. हा बंद यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाने ‘गनिमी कावा’च केला. अचानक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गावातील चौकाचौकांची आंदोलकांनी रास्ता रोको करीत ‘नाकाबंदी’ केली. या नाकाबंदीमुळे आंदोलकांशिवाय एकाही वाहनाला येण्या-जाण्यासाठी मार्गाच शिल्लक नव्हता. परिणामी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अख्खा औरंगाबाद जिल्हा जागच्या जागी थांबला होता.

रस्त्यांवर हातात भगवा झेंडा घेऊन फिरणार्‍या मराठा आंदोलकांशिवाय कुणीही दिसत नव्हते. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद दिसून आला. या बंदमुळे दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. दोन वर्षे मूक मोर्चाच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या मराठा समाजाने मागील महिन्याभरापासून आंदोलनाला उग्र रूप दिले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून क्रांती मोर्चाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी गुरुवारी म्हणजेच क्रांती दिनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी अभूतपूर्व असा ‘महाराष्ट्र बंद’ करण्याच्या निर्णय घेतला. यासाठी गेल्या दोन दिवसांपासून तयारी सुरू करण्यात आली होती. 

रस्त्यांवर केवळ आंदोलक अन् शुकशुकाट ः या आंदोलनामुळे औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर केवळ हातात भगवे झेंडे घेतलेले मराठा आंदोलक दिसत होते आणि चौकाचौकांमध्ये आंदोलकांचे रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेले जत्थे पाहावयास मिळत होते. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत होती. या बंदमुळे अनेक व्यापार्‍यांनी दुकाने, प्रतिष्ठाणे उघडलीच नाहीत. त्यामुळे सर्वत्र कडकडीत बंद दिसून आला. बंदमुळे रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता. असेच चित्र औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, खुलताबाद या तालुक्यांच्या शहरांमध्ये दिसून आले. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या गावांमध्येही कडकडीत बंद दिसून आला. 

गनिमी कावाच ठरला!

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केवळ बंद पुकारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. बाकी कोठे काहीही आंदोलन नसेल, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, नऊ ऑगस्टला मराठा समाज केवळ बंदच करणार नाही, तर गनिमी कावा पद्धतीने काही तरी वेगळे आंदोलन करणार, अशी प्रशासनाला कुणकुण लागलेली होती. शिवाय गुप्तचर विभागानेही तसा अहवाल दिलेला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणा सज्ज होती अन् प्रशासनाला वाटत असलेली शक्यता ही खरीच ठरली. सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी शहरातील प्रत्येक भागाला, ग्रामीणमधील प्रत्येक तालुका, गावाला जोडणार्‍या रस्त्यांवर आणि प्रत्येक महामार्गावर चौकाचौकांत गुरुवारी सकाळपासूनच ठिय्या मांडत रास्ता रोको केला आणि एक प्रकारे अख्ख्या जिल्ह्याची ‘नाकाबंदी’च करून टाकली. 

जालना रोडवर टायर जाळले

केंब्रिज चौकापासून ते बाबा पेट्रोलपंपापर्यंत जालना रोडवर ठिकठिकाणी आंदोलकांनी टायर जाळून वाहतूक रोखली. दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट असल्याने रास्ता रोकोचा फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु, सायंकाळी साडेपाच वाजता क्रांती चौकात राष्ट्रगीत झाल्यावर बंद थांबविण्यात आला. त्यानंतर अचानक रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली. पण, त्यानंतरही आकाशवाणी चौक, सेव्हलहिल उड्डाणपुलाच्या दोन बाजू आणि गजानन महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता, राज पेट्रोल पंपासमोर, हायकोर्ट सिग्‍नल, सिडको चौक, मुकुंदवाडी चौक, धूत हॉस्पिटल चौक, चिकलठाण्यातील मिनी घाटी आणि केंब्रिज चौकापर्यंत आंदोलक रस्त्यांवर होते. सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळ एसएफएससमोर आंदोलकांनी टायर जाळले. त्यापुढे लोखंडी खांब रस्त्यावर आडवे टाकण्यात आले होते. त्यामुळे घराकडे परतणार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागला.

वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत ः मराठा समाजाच्या चौकाचौकांतील ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोकोमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले. बाहेरगावाहून आलेले एकही खासगी, प्रवासी वाहतुकीचे वाहन औरंगाबाद शहर किंवा जिल्ह्यात येऊ शकले नाही अन् येथे असलेली वाहने बाहेर पडू शकली नाहीत. प्रवासी, मालवाहतुकीच्या वाहनांबरोबरच खासगी दुचाकी, चारचाकी वाहने, रिक्षांनाही येण्या-जाण्यासाठी मार्गच शिल्लक नव्हता. त्यामुळे सकाळपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते. शहरवासीयांनीही बाजारपेठा बंद, शाळा बंद आणि रस्ते बंद असल्याने घरातून बाहेर पडणे टाळले.