Thu, Apr 25, 2019 21:32होमपेज › Aurangabad › मराठा ठोक मोर्चा : औरंगाबादमध्ये  इंटरनेट बंद; तणावपूर्ण वातावरण

औरंगाबाद : मराठा आंदोलक आक्रमक; हार्ट अटॅकने पोलिसाचा मृत्यू

Published On: Jul 24 2018 1:25PM | Last Updated: Jul 24 2018 1:57PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी  आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या ठोक मोर्चाला राज्यभर हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काल मराठा आरक्षणाची मागणी करत गोदावरीत उडी घेतल्यानंतर मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे या तरुणावर आज सकाळी अंत्यसंस्कार झाले. यावेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या खासदार चंद्रकांत खैरै आणि आमदार सुभाष झांबड यांना रोखण्यात आले. तसेच त्यांना मारहाण केल्याचीही घटना घडली.

दरम्यान, औरंगाबादमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. मोर्चाच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलक चौकाचौकात जमले असून क्रांती चौकात २ ते ४ हजार लोकांचा जमाव आहे. शहरात अग्निशमन दलाची गाडी उलटवण्यात आली. जमावाने पोलिस गाड्यांवरही हल्ला केला.  यात २ वरीष्ठ पोलिस जखमी झाले आहेत. आंदोलकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांची कुमक कमी पडत आहे. 

कन्नड तालुक्यात तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. कन्नड तालुक्यातील नदीत आणि विहिरीत उडी मारुन दोघांनी तर एकाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

आज राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातील सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र, आंदोलकांनी जाळपोळ आणि पोलिस गाड्यांवर हल्ला केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. आंदोलक रस्त्यावर उतरल्याने नगर रोड वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या रस्त्यावर २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.