Wed, Aug 21, 2019 01:54होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षण पेटले

मराठा आरक्षण पेटले

Published On: Dec 19 2017 1:18AM | Last Updated: Dec 19 2017 12:32AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने सुरू होती. सोमवारी मात्र, याच मुद्यासाठी अचानक हिंसक आंदोलन झाले. जालना रोडवर औरंगाबाद खंडपीठाजवळच छावाच्या काही कार्यकर्त्यांनी दुपारी एसटी बस अडवून तुफान दगडफेक केली. शिवाय आरक्षणाबाबत लवकर निर्णय न झाल्यास राज्यात एकही एसटी बस फिरू देणार नाही, अशी पत्रकेही या कार्यकर्त्यांनी तेथे फेकली. या तोडफोड प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात छावाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

मराठा आरक्षण आणि कोपर्डीतील नराधमांना तत्काळ फाशी द्या, यासह अन्य काही मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून मराठा समाज एकवटला आहे. याच मागण्यांसाठी आतापर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात अतिविराट असे 58 मूक मोर्चे काढले, मात्र या मागण्यांसंदर्भात ठोस असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे समाजात असंतोष खदखदत आहे. याचाच उद्रेक अखेर सोमवारी झाला. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास छावा संघटनेचे ज्ञानेश्‍वर गायकवाड यांच्यासह सहा ते सात कार्यकर्ते सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ आले. त्यांनी अक्‍कलकोट ते चाळीसगाव बस (क्र. एमएच 14, बीटी 2359) अडविली. चालकाला समज देऊन थांबण्यास सांगितले. बस थांबताच या कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक करीत तिच्या काचा फोडल्या.  

दरम्यान, विशेष शाखेचे फौजदार गोरख चव्हाण यांना छावाचे कार्यकर्ते बस फोडणार असल्याची माहिती घटनेच्या काही मिनिटे अगोदरच मिळाली होती. माहिती मिळताच चव्हाण यांनी तत्काळ सेव्हनहिलच्या दिशेने धाव घेतली; परंतु तोपर्यंत या कार्यकर्त्यांनी बस फोडली होती. चव्हाण येत असल्याचे पाहून या कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. घटनेनंतर सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज, कैलास प्रजापती यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. या प्रकरणी बसचालक विजय त्र्यंबक अहिरराव (53, रा. चाळीसगाव) यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

पत्रके फेकली

दगडफेक करतानाच या कार्यकर्त्यांनी ‘मराठा आरक्षण मिळायलाच हवे’ अशा घोषणा देत बसमध्ये पत्रके फेकली. या पत्रकावर ‘शासनाने हिवाळी अधिवेशनातच मराठा आरक्षणाची लवकर घोषणा करावी, अन्यथा राज्यात एकही बस फिरू देणार नाहीत’ असा इशारा देण्यात आला आहे. तसेच ‘मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटक करू नये, अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाहीत. मराठा आरक्षण, स्वामिनाथन आयोग, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ यावर तत्काळ निर्णय घ्यावा’ अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.