Tue, Jul 23, 2019 01:56होमपेज › Aurangabad › आत्महत्येनंतर चिकलठाण्यात तणाव

आत्महत्येनंतर चिकलठाण्यात तणाव

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 03 2018 1:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीतील रहिवासी उमेश एंडाईत (21) या तरुणाने गुरुवारी दुपारी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन जीवन संपविले. हा प्रकार मराठा क्रांती मोर्चा आणि संघटनांना समजताच त्यांनी चिकलठाणा चौकात येऊन जालना रोडवर रास्ता रोको केला. तासभर घोषणाबाजी करीत वाहने रोखून धरली. चाकरमान्यांची ऐन घरी पोहोचण्याची वेळ असल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी, असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी देताच आंदोलन मागे घेण्यात आले. 

30 जुलै रोजी मुकुंदवाडीतील प्रमोद जयसिंग होरे (31, रा. जे-सेक्टर, मुकुंदवाडी) या तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच चिकलठाण्यातील उमेश एंडाईत या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मराठा संघटनांना समजताच प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक आक्रमक झाले. सुरुवातीला शांततेत असणारे तरुण पोलिसांनी गुन्हे नोंदविण्याची भाषा वापरताच रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करू लागले. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजता आंदोलकांनी चिकलठाण्यात जालना रोड रोखला. तत्काळ रस्त्यावर दगड आणून टाकण्यात आले. दोन्ही बाजूची वाहने रोखून धरण्यात आली. तत्पूर्वी पोलिसांना घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याने, तगडा बंदोबस्त तैनात करण्यात  आला होता. उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्‍त डॉ. नागनाथ कोडे, ज्ञानोबा मुंडे, गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती, नाथा जाधव, निर्मला परदेशी, मधुकर सावंत, मुकुंद देशमुख, सुरेंद्र माळाळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून मध्यस्थी केली.

पोलिसांची यशस्वी मध्यस्थी ः आंदोलक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच दंगा काबू पथक, वज्र आणि वरुण ही वाहने आंदोलनस्थळी आणण्यात आली. पोलिसांचा तगडा फौजफाटा दाखल झाला. त्यामुळे परिस्थिती निवळली. तसेच, पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून व्हाट्सअ‍ॅपवर आलेले पत्र पोलिस व्हॅनच्या माईकद्वारे वाचून दाखविले. ठोस आश्‍वासन मिळताच त्यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर आंदोलक रस्त्यावरून बाजूला झाले. 

आठ दिवसांपासून होता नोकरीच्या शोधात

मृत उमेश एंडाईत हा प्रचंड होतकरू होता. 19 जुलैपासून सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनात तो हिरीरीने सहभागी होत होता. उमेश एंडाईत याला बारावीत 61 टक्के गुण मिळालेले असून वसंतराव नाईक कॉलेजमधून त्याने बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्याला 62 टक्के गुण मिळालेले आहेत. तो रसायनशास्त्रात एमस्सी करणार होता. त्यासाठी त्याने दोनवेळा सीईटी परीक्षा दिली. पण, त्याला कुठेच अ‍ॅडमिशन मिळाले नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. तसेच, तो अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात होता. आठ दिवसांत तो दोन ठिकाणी मुलाखतीसाठीही गेला होता. पण, त्याला अपयश आले होते.  

बहीण-भाऊ उच्चशिक्षित

मृत उमेश एंडाईतचे वडील एका कंपनीत कामाला आहेत. आई शेतीकाम करते. तर, मोठा भाऊ सीएकडे प्रॅक्टिस करीत असून, बहीण बीए द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तो स्वतः बँकिंगचे क्‍लास करीत होता.