होमपेज › Aurangabad › आणखी एकाची आत्महत्या, दोघांचा प्रयत्न

आणखी एकाची आत्महत्या, दोघांचा प्रयत्न

Published On: Aug 05 2018 1:39AM | Last Updated: Aug 05 2018 1:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा समाजाचा अंत पाहू नका, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती करीत चिठ्ठी लिहून बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एकाने आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यात आरक्षण मागणीसाठी तरुणाने विष घेतले. लातूरला एका युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तसेच मराठा क्रांतीच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी होणार्‍या ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार, खासदारांनी सहभागी व्हावे, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा लातूरला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी  देण्यात आला. दरम्यान हिंगोली, परभणी जिल्ह्यात आंदोलन सुरूच आहे.

बीड : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील शिवाजी तुकाराम काटे (वय 42) यांनी शुक्रवारी बेडूकवाडी शिवारातील वस्तीवर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री यांच्या नावे चिठ्ठी लिहिली आहे. मराठा समाजाचा अंत न पाहता आरक्षण द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.  दरम्यान, मराठा आरक्षणासाठी शनिवारी शिक्षक, प्राध्यापक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान शिक्षक, प्राध्यापकांनी आरक्षण, शिष्यवृत्ती नसल्याने विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणींचा पाढा वाचला.

..तर क्रांतिदिनी मराठा आमदारांना फासणार काळे

लातूर : मराठा क्रांतीच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी होणार्‍या ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार, खासदारांनी सहभागी व्हावे अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी आयोजित ठिय्या  आंदोलनातून देण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन झाले. यावेळी आमदार काळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सकाळी पावणेअकराच्या सुमारास ‘एक मराठा, लाख मराठा’, अशी घोषणा देत व घंटानाद करीत हे आंदोलन सुरू झाले. तत्पूर्वी, सुमित सावळसुरे व नवनाथ माने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी लातूर येथील एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.  विजय तुकाराम मोरे (25) असे त्या तरुणाचे नाव आहे. विजय हा शिवाजी चौकात रॉकेलची बाटली घेऊन आला. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा देत त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतले. तेथे असलेल्या पोलिसांनी त्याच्या हातातून बाटली हिसकावून घेतली.

तरुणाने विष घेतले

नांदेड : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी  नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील केदारवडगाव येथील कृष्णा बळीराम जाधव (वय 22) या तरुणाने सकाळी साडेनऊच्या सुमारास  विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नायगाव तालुक्यातील केदारवडगाव येथे शनिवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन होते. दरम्यान, यावेळी कृष्णा जाधव या तरुणाने विष घेतले. यानंतर त्याला नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.